लातूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंती निमित्त शिवमहोत्सव समिती व अक्का फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील क्रिडा संकुलाच्या मैदानावर तब्बल अडीच एकर परिसरात छत्रपती शिवरायांची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली होती. या रांगोळीचे दर्शन घेण्यासाठी जवळपास दीड ते दोन लाख नागरिकांनी क्रिडा संकुलावर हजेरी लावलेली होती. या विश्वविक्रमी रांगोळीचे ३८९ दिव्यांचे प्रज्वलन करुन दिपोत्सव साजरा करत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर व माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन करण्यात आले.
लातूरचा नावलौकिक संपूर्ण जगभरात व्हावा या उद्देशाने शिवमहोत्सव समिती व अक्का फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची ३८८ वी जयंती आगळया-वेगळया पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार येथील क्रिडा संकुलाच्या मैदानावर तब्बल अडीच एकर परिसरात (१ लाख ११ हजार ८४३) चौरस फुट जागेत छत्रपती शिवरायांची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्याचे ठरविण्यात आले होते. ही रांगोळी मंगेश निपाणीकर यांच्यासह तब्बल ६० कलाकारांच्या संकल्पनेतून रेखाटण्यात आली. या रांगोळीचे भूमिपूजन रुपाताई पाटील निलंगेकर तर उद्घाटन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. ही रांगोळी काढण्यासाठी ५० हजार किलो विविध रंगातील रांगोळीचा वापर करण्यात आला होता. ही विश्वविक्रमी रांगोळी पाहण्यासाठी तब्बल दीड ते दोन लाख नागरिकांसह शिवप्रेमीनी क्रिडा संकुलाच्या मैदानावर हजेरी लावलेली होती. त्याचबरोबर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर, माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख, अरविंद पाटील निलंगेकर, धिरज देशमुख, तृप्ती देसाई, अर्चना पाटील चाकूरकर आदी मान्यवरांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या विश्वविक्रमी रांगोळीचे विसर्जन २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ८ वाजता दिपोत्सवाने करण्यात आले. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर व माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रिडा संकुलाच्या मैदानावर ३८९ दिपप्रज्वलीत करण्यात आले होते. यावेळी माजी केंद्रीयमंत्री चाकूरकर यांनी मंगेश निपाणीकर व त्यांच्या समुहाने ही रांगोळी साकारुन छत्रपती शिवरायांचे विश्वरुप दाखविल्याबद्दल कौतूक केले. या माध्यमातून लातूरचा नावलौकिक जगभरात निश्चित होईल याची नोंद विश्वविक्रम म्हणून होईल असा विश्वास व्यक्त केला. माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांनी या विश्वविक्रमी रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे विचार सर्वामध्ये रुजविण्याचे मोठे कार्य झाले असून ही रांगोळी निश्चितच विश्वविक्रमी ठरुन लातूरची नोंद जागतिक स्तरावर होईल असे सांगितले. यावेळी शैलेश पाटील चाकूरकर, अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह महोत्सव समितीचे ऍड.शैलेश गोजमगुंडे, गणेश गोमचाळे, ज्ञानेश्वर चेवले यांच्यासह महोत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते. विसर्जित करण्यात आलेली रांगोळी नागरिकांनी आपआपल्या घरी नेऊन छत्रपती शिवरायांचा रांगोळी रुपी ठेवा आपल्या घरात जतन केला आहे.
Comments