HOME   लातूर न्यूज

शादीखान्याच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा

सुनील फार्म इंजिनिअरींगने इतर ठिकाणी जागा देण्याची केली होती मागणी


शादीखान्याच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा

लातूर: अल्पसंख्यांक समाजासाठी जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेला शादीखान्याचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता निधी प्राप्त असूनही जागेअभावी याच्या बांधकामास सुरूवात झालेली नव्हती. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी घेतलेल्या सुनावणीत शादीखान्याच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झालेला असून शहरातील आरक्षण क्र. 82 येथे 2268 चौ. मी. जागा मे. सुनील फार्म इंजिनिअर यांच्याकडून महापालिकेस हस्तांतरीत करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे लवकरच शादीखान्याच्या बांधकामास सुरूवात होणार आहे.
शहरातील आरक्षण क्र. 82 येथील व्यापारी संकुल मे. सुनिल फार्म इंजिनिअर यांच्यावतीने विकसित करण्यात आलेले होते. सदर जागेत शादीखाना अथवा सामाजिक सभागृहाचे आरक्षण होते. मात्र सुनील फार्म इंजिनिअरींगने या बदल्यात इतर ठिकाणी जागा द्यावी अशी दाद उच्च न्यायालयात मागीतली होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून निधी प्राप्त होऊनही शादीखाना अथवा सामाजिक सभागृहाचा प्रश्‍न रखडलेला होता. यापूर्वी शादीखान्याचे दोनदा भूमिपुजन होऊन सुध्दा याच्या बांधकामाची पुर्तता करण्यात अपयश आलेले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी सुनावणी घ्यावी असे स्पष्ट केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी याबाबतची सुनावणी घेतली.
या सुनावणीत शहर महानगरपालिका हद्दीतील आरक्षण क्रमांक 82 येथील व्यापारी संकुल क्षेत्रातील दक्षिण, पश्‍चिम कोपर्यातील रिक्त असलेले 42 मीटर बाय 54 मीटर (2268 चौ. मीटर जागा) मे. सुनील फार्म इंजिनिअर यांनी त्यांच्या हक्कातून मुक्त करून शहर महानगरपालिकेकडे शादीखाना अथवा सामाजिक सभागृह बांधण्याकरीता हस्तांतरीत करावी असे आदेश दिले. याच्या बांधकामाची कार्यवाही तात्काळ चालू करावी असे निर्देश मनपास दिलेले आहेत. महानगरपालिकेने मे. सुनील इंजिनिअर यांना या बदल्यात पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी असेही निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या या निर्देशामुळे शादीखाना अथवा सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून अल्पसंख्यांक समाजासाठी जिव्हाळ्याचा असलेला हा प्रश्‍न आता निश्‍चित सुटून लवकरच शादीखान्याच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. या माध्यमातून मनपा निवडणुकीदरम्यान भाजपाने दिलेल्या आश्‍वासनपूर्तीकडे एक पाऊल उचलले असल्याचे सांगून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, संघटन सरचिटणीस गुरुनाथ मगे, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे यांनी लवकरच शादीखान्याच्या कामास सुरूवात करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.


Comments

Top