लातूरः लातूरकरांनी जो विश्वास दाखवून मनपाची सत्ता भाजपाच्या हाती सोपविली आहे, तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून शहरात लवकरच पालकमंत्री संभाजी पाटील व मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या माध्यमातून दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीच्या दिशेने खर्या अर्थाने वाटचाल होणार असून शहरविकासाकरीता आगामी काळात लातूरकरांसह व्यापार्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केले आहे.
मनपाची सत्ता भाजपाच्या हाती सोपवून वर्षपूर्ती लवकरच होत आहे. ही वर्षपूर्ती होण्याअगोदर निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी लवकरच विविध विकासकामांचा शुभारंभ मनपाच्या वतीने करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडत असलेला शादीखान्याचा प्रश्न सोडविण्यात यश आलेले असून सदर जागा मनपाच्या ताब्यात घेण्यात आली आहे. या जागेवर लवकरच सुसज्ज शादीखाना बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. सदर जागा मनपा मालकीची असतानाही ती ताब्यात नव्हती. या प्रकरणी जिल्हाधिकार्यांमार्फत सुनावणी झाली असून ही जागा मनपाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कन्हेरी शिवारात असलेले साडेतीन एकर जागेत लिंगायत स्मशानभूमी उभारण्यात येणार असून यामुळे मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. भविष्यात महावितरण कंपनीकडून वीज खंडित होण्यासारखे प्रकार होऊ नयेत याकरीता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास शासनाने तत्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. २५ कोटी रुपयांच्या निधीद्वारे पाच मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असून याकरीता लवकरच महावितरणचे अधिकार्यांकडून जागेची पाहणी करण्यात येऊन त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सतावत होता. यामुळे लातूरकरांची मोठी गैरसोयही होत होती. ही गैरसोय थांबविण्याकरीता लवकरच मनपाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांत दहा ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येणार असून महिनाअखेर ही स्वच्छतागृहे चालू करण्यात येणार आहेत. आगामी काळात आणखी १२ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होऊन त्यावर प्रक्रिया करून हे पाणी पुन्हा वापरता यावे याकरीता या प्रकल्पास मंजुरी मिळाली असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे. या प्रक्रियेतून उपलब्ध होणारे पाणी रेल्वे बोगी प्रकल्पासह औद्योगिक वसाहतीला देण्यात येणार असल्याने मनपाच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मनपाची आर्थिक स्थिती अधिक भक्कम व्हावी यासाठी लातूरकरांनी कर भरून आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर व्यापार्यांच्या म्हणण्यानुसार एलबीटीचा प्रश्न सोडविण्यात आला असून व्यापार्यांनी सुध्दा एलबीटीचा भरणा करून शहरविकासास हातभार लावावा, असे या पत्रपरिषदेच्या माध्यमातून महापौर, उपमहापौरांनी व्यापार्यांना अवाहन केले. या पत्रपरिषदेस स्वीकृत सदस्य तथा शहर जिल्हा संघटन सरचिटणीस गुरुनाथ मग्गे यांची उपस्थिती होती.
Comments