लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली देशासह राज्याचा सर्वागीण विकास होत आहे.सबका साथ सबका विकास या संकल्पनेनुसार मराठवाड्याच्या विकासासाठी सुध्दा बांधील असलेल्या सरकारने मराठवाड्यात विविध विकासाच्या योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील तरुणांना रोजगारासाठी स्थलातरीत व्हावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन येथील बेरोजगारांना येथेच रोजगार प्राप्त व्हावा याकरीता लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पाची उभारणा करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भुमिपुजन आज दिनांक ३१ मार्च रोजी दुपारी ०४ वाजता केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे . या प्रकल्पामुळे केवळ जिल्ह्याच्या नव्हे तर मराठवाड्याच्या विकासाची सुरुवात होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे. मराठवाड्यात पर्जन्यमानाचे प्रमाण कमी असल्याने हा भाग मागास राहिलेला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश भागात रोजगारांची संधी प्राप्त होत नाही. मागील काळात असलेल्या राज्यकर्त्यानी या बाबीकडे लक्ष न देता केवळ कारखानदारी उभी केली. या कारखानदारीमुळे रोजगाराच्या जास्त संध्या प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील तब्बल सव्वाचार लाख तरुणांना स्थंलातरीत होण्याची वेळ आली आहे. लातूर जिल्हा शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिध्द असले तरी शिक्षण घेतलेल्या युवकांना कामासाठी बाहेर जावे लागत होते. या बाबीकडे लक्ष वेधले न गेल्यामुळेच लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याचा परिपुर्ण विकास होऊ शकला नाही. सबका साथ सबका विकास ही भुमिका घेऊन काम करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना ही बाब लक्षात आणुन देण्यात आली. मराठवाड्याचा विकास व बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळावा असा मोठा प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार देशातील चौथी व महाराष्ट्रातील पहिली रेल्वे कोच फॅक्टरी लातूर येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प दोन हजार एकर जागेत उभारण्यात येत असुन त्यांच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु करण्यात येत आहे. तीन टप्प्यात उभारण्यात येणार्या या प्रकल्पामुळे जवळपास 15000 युवकांना थेट रोजगार तर अप्रत्यक्षपणे ३५ ते ४० हजार जणांना रोजगार प्राप्त होणार आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्र यामध्ये झालेल्या करारानुसार या प्रकल्पात 80 टक्के स्थानिक लोकांना रोजगार देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ६०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. या प्रकल्पात मॅट्रोसाठी आवश्यक असणारे कोच बनविण्यात येणार असुन या प्रकारचे कोच बनविणारी देशातील हा पहिलाच प्रकल्प राहणार आहे. यापुर्वी मेट्रोचे कोच परदेशातून निर्यात करण्यात येत होते. आता या प्रकल्पामुळे आपल्या देशातच हे कोच बनविण्यात येणार असल्याने आगामी काळात या प्रकल्पाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर परदेशात सुध्दा हे कोच निर्यात करण्यात येणार असल्याने भविष्यात हा प्रकल्प केवळ लातूर जिल्ह्याच्याच नव्हे तर मराठवाड्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
Comments