लातूर: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांशी लातूर जिल्हा प्रशासनाने ०४ एप्रिल रोजी आपुलकीचा संवाद साधला. याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन होणार आहे. सन जानेवारी २०१२ ते ३१ मार्च, २०१८ या कालावधीत शेतकरी आत्महत्या झालेल्या प्रत्येक कुटुंबाशी भेटीतून संवाद साधला गेला. यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, मागण्या याविषयी जिल्हा प्रशासनाने घरोघरी भेटी देवून अडचणी जाणून घेतल्या. त्याची माहिती एकत्र करुन कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबियांना जीवन जगण्याची उभारी देण्यात येईल याविषयी जाणून घेण्याविषयी विभागीय आयुक्ताने मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला सूचित केले होते. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये १५ तारखेला प्राथमिक भेटी देण्यात आल्या होत्या. यावेळी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात जिल्ह्यातील एकूण ३८१ शेतकरी कुटुंबियांच्या घरी भेटी देण्यात आल्या. मागील भेटीत शेतकऱ्यांनी ज्या मागण्या जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या त्या बरोबरोबर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. याविषयी या शेतकरी भेट अहवालाचा फायदा होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने उदरनिर्वाह आरोग्य, कर्ज विषयक, तसेच निवृत्तीवेजन, वीज जोडणी अशा मागण्या संबंधित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या आहेत.
लातूर प्रशासनाने ३८१ कुटुंबांना भेटी देवून प्राथमिक अहवाल तयार केला असून जिल्ह्यात ३८१ शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबियांच्या घरी भेटी देण्यात आल्या. औसा तालुक्यात ९४, लातूर ५७, रेणापूर ३०, निलंगा ५७, शिरुर अनंतपाळ १०, देवणी ३१, उदगीर १५, जळकोट १८, अहमदपूर ४० व चाकुर २९ अशा एकूण ३८१ आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबास भेटी देण्यात आल्या. यावेळी झालेल्या सर्वेक्षणाचे विशेष म्हणजे जात प्रवर्गनिहाय तसेच स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी सोबत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कुटुंबास भेटी दिल्या आहेत. एक प्रकारे शेतकरी कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी सुक्ष्म स्तरावरील विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. विविध योजनेअंतर्गत लाभ मिळावा यासाठी शेतकरी कुटुंबियाकडून मदत मागितली आहे. त्या त्या कुटुंबाच्या गरजेप्रमाणे आरोग्यविषयक सुविधा, कौशल्य विकास व उद्योजकता, कर्ज, वैरण विकास, वीज जोडणी (घरगुती वापर), शेततळे, गॅस जोडणी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा, शुभमंगल सामुहिक विवाह योजना, वसतीगृह, शौचालय, घरकुल, जनधन बँक खाते, कुटुंब अर्थसहाय्य योजना, वेतन योजना, इतर योजना एक व दोन अशा प्रकारच्या स्वरुपात वर्गवारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत कौशल्य व रोजगार, उद्योजकता यामध्ये ९५ लाभार्थींपैकी ४८ जणांना लाभ मिळवून दिला आहे. वसतीगृह सुविधेमध्ये ६३ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळवून दिला जाणार आहे. विहीर २१ जणांना मंजूर झाली. कुटुंब अर्थसहाय्य योजनेमध्ये ९९, संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ५१ अशा ३२६ कुटुंबांना विविध योजनेची मदत मिळाली आहे.
Comments