HOME   लातूर न्यूज

उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना मांजराचे पाणी मिळणार


उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना मांजराचे पाणी मिळणार

लातूर : लातूर व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या मांजरा प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा व्हावा यासाठी मांजरा तील पाणी सोडावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
मागील दोन वर्षांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात या वर्षी पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी वापरता यावे यासंदर्भात पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कडाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप व आमदार त्र्यंबक भिसे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. यावेळी विभागाच्या वतीने प्रकल्पातील आजचा पाणीसाठा आणि शेतीसाठी उपलब्ध पाणीसाठा याचा आढावा पालकमंत्र्यांना सादर करण्यात आला. उपलब्ध पाणीसाठ्याचा अंदाज घेता शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी देता येऊ शकते हे लक्षात आले. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे निर्देश पालकमंत्री संभाजीराव पाटील यांनी दिले .याशिवाय मांजरा नदीवर बांधण्यात आलेल्या उच्च पातळी बंधाऱ्यामधून २० दलमी पाणी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा प्रकल्पात यावर्षी पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागणी केली तर पाणी देण्यात येईल असेही या बैठकीत ठरले. मांजरा प्रकल्पातील पाणी सोडण्याचा फायदा या जिल्ह्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकाला होणार आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईत ऊसाला पाणी कमी पडते. या काळात मांजरा प्रकल्पातील पाणी कालवे व बंधाऱ्यामध्ये सोडले तर हे पाणी शेतकऱ्यांना वापरता येणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाने व पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या बैठकीस विविध पाणीवापर संस्थांचे चेअरमन, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


Comments

Top