लातूर: विमानातील विज्ञान समजून देण्याच्या मुख्य उद्देशाने विश्वशांती गुरुकुलाच्या वतीने लातूर जिल्हातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच भव्य ‘एरोमॉडेलिंग शो’ रविवार, दि. ८ एप्रिल रोजी दुपारी ४.३० ते ७ या वेळेत विश्वशांती गुरुकुल, आर्वी-साई रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या एरोमॉडेलिंग शो मध्ये एरो मॉडलर सदानंद काळे व पुणे, अहमदनगर, सातारा येथील अनुभवी निष्णात एरोमॉडेलर्सचा संघ प्रात्यक्षिके सादर करणार आहे.
यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या एरोमॉडेलिंग शोमध्ये लाकूड आणि थर्माकोलमधून बनविलेल्या लहान मोठ्या आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रीकल मोटर आणि इंजिनवर उडणार्या रेडिओ कंट्रोलने नियंत्रित करता येणार्या आकर्षक मॉडेल्सची प्रात्यक्षिके आणि हवाई कसरती शोच्या माध्यमातून दाखविल्या जाणार आहेत.
ट्रेनर विमान, पक्षाप्रमाणे हवेत तरंगणारी ग्लायडर्स, उडती तबकडी, बॅनर टोईंग या शिवाय लूप रोल, स्पिन यासारखी थरारक लढावू विमानाच्या कसरती पाहायला मिळणार आहेत. तसेच रेडिओ कंट्रोलने उडणारे वेगवेगळ्या कसरती पाहयला मिळणार आहेत. या शो दरम्यान मैदानात फक्त ५० ते १५० फुटांच्या मर्यादेतच ही प्रात्यक्षिके दाखविली जाणार असून ती अगदी नजरे समोर बघता येणार आहेत. त्याचप्रमाणे या शोच्या वेळी एक मोठे विमान हवाई पुष्पवृष्टीही करणार आहे.
सबंधीत एरोमॉडेलिंग शो सर्वांसाठी निःशुल्क असून लातूर शहर व जिल्हयातील जास्तित जास्त विद्यार्थी व नागरिकांनी या शोचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments