लातूर: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ५० वर्षावरील वृद्ध कलावंत व साहित्यिकांना मानधन दिले जाते .यासाठी लातूर जिल्ह्यातून वृद्ध कलावंत व साहित्यिकांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभाग्रहात मंगळवारी सकाळी या निवडप्रक्रियेला प्रारंभ झाला. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या अध्यक्षतेत समाज कल्याण सभापती संजय दोरवे यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, निवड समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव जगताप यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके म्हणाले की कलाकार हे आपली कला सादर करताना जनतेचे मनोरंजन करतात. केवळ मनोरंजनच नाही तर या माध्यमातुन जनतेचे प्रबोधन करण्याचे महत्वाचे काम त्यांच्याकडुन केले जाते. आयुष्यभर हे काम केल्यानंतर वृद्धापकाळात त्याना काम करणे शक्य होत नाही या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून आणि त्यांचा आणि त्यांच्या कलेचा सांभाळ करण्याच्या भुमिकेतून कलावंताना पाठबळ देणे हे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच वृद्ध कलावंतांना मानधन दिले जाते. कलावंतांची निवड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करून त्यांना मानधन दिले जाते. जिल्हा परिषद यासाठी निवड प्रक्रिया राबवित आहे. जिल्हा परिषदेच्या आजपर्यंतच्या लौकिकानुसार ही प्रक्रियादेखील संपूर्णपणे पारदर्शक असणार आहे. यातून योग्य कलावंतांची निवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या धोरणानुसार कलावंतांचे तीन गट करून त्यांना मानधन दिले जाते. त्यापैकी वर्ग अ मध्ये प्रतिमहिना २१०० रुपये मानधन मिळते. यासाठी संबंधित कलावंताने राष्ट्रीय पातळीवर आपली कला सादर केलेली असणे आवश्यक आहे. त्या कलाकाराकडे तसे प्रमाणपत्रही असणे गरजेचे आहे. वर्ग ब मध्ये १८०० रुपये दिले जातात. संबंधित कलाकार राज्यपातळीवर कला सादर करणारा असणे आवश्यक आहे. वर्ग क मध्ये पंधराशे रुपये मानधन दिले जाते. हा कलाकार किमान जिल्हा पातळीवर काम करणारा असणे आवश्यक आहे. प्रतिवर्षी ६० कलाकारांना असे मानधन दिले जाते. जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी सुरू झालेली निवड प्रक्रिया दिनांक १४ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. २०१६-१७ व २०१७-१८ साठी प्रत्येकी ६० अशा एकूण १२० कलाकारांची निवड केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडे १२८२ अर्ज आले आहेत. निवड समिती प्रत्येक कलाकाराला ०३ मिनिटांचा वेळ देऊन त्यांची कला पाहणार आहे. प्रत्येकासाठी ५० गुण दिले जाणार आहेत. दररोज दोन तालुक्यातील कलाकार, कलावंतांची निवड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांनी दिली. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह निवड समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.
Comments