HOME   लातूर न्यूज

जिल्हा परिषदेने केला जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार

लोकमत परिवाराच्या वतीने प्रॉमिसिंग आयएएस पुरस्कार!


जिल्हा परिषदेने केला जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार

लातूर: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना लोकमत परिवाराच्या वतीने प्रॉमिसिंग आयएएस हा पुरस्कार देण्यात आला याबद्दल जिल्हापरिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना लोकमत परिवाराच्यावतीने सन्मानित करण्यात आले. या माध्यमातून लातुरात काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. यामुळे जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी श्रीकांत यांना सन्मानित करुन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहिदास वाघमारे, राजू कांबळे यांची यावेळी उपस्थिती होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा सत्कार केला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेचा वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामे व जनतेसाठी केल्या जाणाऱ्या कार्याची चर्चा झाली. उपाध्यक्ष तिरुके यांनी जिल्हा परिषद शाळेचा पट वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. शासनाकडून जिल्हा परिषदेला विकास कामांसाठी दिला जाणारा निधी परत जाऊ नये यासाठी विकास कामे गतीने करण्याबाबत याबाबत चर्चा झाली. या कामांसाठी शासनाकडून येणारा निधी तात्काळ वर्ग करुन देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. शिक्षण, बांधकाम, आरोग्य विभागा अंतर्गत केली जाणारी कामे आणि त्यासाठी लागणारा निधी याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी ग्वाही दिली. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


Comments

Top