लातूर: एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी त्याचप्रमाणे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मालेगांवचे मौलाना मुफ्ती उमराईन हे येत्या शनिवारी उदगीरच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत उदगीर येथे सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा परिषद मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष सय्यद ताहेर हुसेन यांनी लातुरात पत्रकारांशी बोलतांना दिली.
खा. असुदोद्दीन ओवैसी यांच्या लातूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लातूरच्या शासकीय विश्रामगृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना सय्यद ताहेर हुसेन पुढे म्हणाले की, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने सदर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तिहेरी तलाकच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर मुस्लिम समाजाच्या हितासाठी विचारविनिमय करण्याचे निर्देश दिले आहेत. तरी केंद्र सरकारने याबाबतीत जो कायदा बनवला आहे, तो या एका ठराविक समाजाला समोर ठेवून बनवला आहे. तो कायदा मुस्लिम समाजासाठी घातक असल्याने तिंहेरी तलाकच्या विरोधात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मुस्लिम धर्मियांच्या कायद्यात कोणतेही कारण नसतांना बदल करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपा सरकार करीत आहे. आपल्या देशात सर्वच समाजातील एकूण २४ लाख महिला घटस्फोटित आहेत. त्यात मुस्लिम समाजाच्या तीन लाख तर ख्रिश्चन समाजाच्या एक लाख महिलांचा समावेश आहे. तर त्यामध्ये हिंदू समाजाच्या तब्बल २० लाख महिलांचा समावेश आहे. त्याप्रमाणे मुस्लिम समाजाची टक्केवारी कमी असतांनाही अल्पसंख्यांक समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून तो आम्हाला मान्य नाही. मुस्लिम समाजातील एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीला तलाक दिला तर त्यास तीन वर्षांची शिक्षा द्यावी असे प्रस्तावित आहे. तो पुरुष तुरुंगात गेल्यावर आपल्या घटस्फोटित पत्नीला पोटगी देणार तरी कशी? याबाबतीत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याचा देशभरातील मुस्लिम समाज बांधव तीव्र शब्दात निषेध करीत आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची याबाबतची भूमिका विशद करण्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Comments