लातूर: पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली चार वर्षात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी जेवढे योगदान दिले आहे, तेवढे कॉंग्रेसने मागील ७० वर्षांच्या काळातही दिले नाही, असे सांगून बाबासाहेबांचे संविधान कोणीही बदलणार नाही, तशी भिती विरोधक सामान्यांच्या मनात निर्माण करीत आहेत, असे मत खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले. लोहा तालुक्यातील चोंडी येथे भत्तरतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते देवीदास महाराज होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील गौंडगावकर, पंचायत समिती सदस्य बालाजी राठोड, जयंती उत्सव समितीचे सुरेश ढवळे, हरिभाऊ गायकवाड, विजय वाघमारे, बाबुराव बोडके, राजू ढवळे, भास्कर ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गायकवाड म्हणाले, देशात भाजपचे सरकार आल्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या संविधानानुसार कारभार चालवण्याचे काम खर्या अर्थाने सुरू आहे. संविधानाला भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा जाहीर केले. संसदेत प्रवेश करताना सभागृहाच्या पायरीवर नतमस्तक होणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती संपूर्ण जगभरात साजरी केली. एवढेच नव्हे तर डॉ. बाबासाहेबांचे लंडन येथील घर विकत घेऊन त्याचे जागतिक स्मारक म्हणून ते विकसित केले आहे. त्याचप्रमाणे नागपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी जाहीर करून त्या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळवून दिला आहे. मुंबईच्या चैत्यभूमीवर इंदू मिलची जागा घेऊन तेथे आंतरराष्ट्रीय स्मारक साकारण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेल्या महू या गावातील जन्मठिकाणाची जागा विकसित केली आहे. अशा विविध माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विविध स्थळे विकसित करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. भाजप सरकार राज्यघटना बदलणार असल्याची भिती विरोधक सामान्यांच्या मनात भरवत आहेत. घटनेतील कालबाह्य झालेल्या कलमां दुरुस्त्या करता येतात. त्या आजपर्यंतच्या कॉंगे्रस सरकारने हजारवेळा केल्या आहेत. परंतु, मूळ राज्यघटना कोणालाही बदलता येत नाही. यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, शिका , संघटित व्हा, संघर्ष करा असे डॉ. बाबासाहेबांनी सांगितले आहे. शासनकर्ती जमात बना असे ते म्हणाले आहेत. त्यासाठी दलित, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतच विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून प्रशासनात यावे, तीच बाबासाहेबांना खरी श्रध्दांजली ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.
Comments