लातूर: लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. मनपाच्या या एक वर्षाच्या पूर्तीकडे सूक्ष्म कटाक्ष टाकला असता , सर्वप्रथम प्रश्न पडतो तो हा की, लातूर मनपात झालेले सत्तांतर केवळ नावालाच आहे की काय? कारण सत्ताधारी भाजपच्या एकूण ३६ या जादुई आकड्यापैकी २४ नगरसेवक काँग्रेसमधून भाजपात जाऊन मोदी लाटेत निवडून आलेले आहेत. म्हणजे हे २४ नगरसेवक भाजपात असतांनाही मूळ काँग्रेस विचारसरणीचे आहेत, हे मान्यच करावे लागेल. लातूर मनपाच्या एकूण ७० नगरसेवकांपैकी थोडे - थोडके नव्हे तर तब्बल ५४ नगरसेवकांच्या राजकारणाचा मूळ पाया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच राहिलेला आहे. त्यामुळे भाजपाने लातूर मनपाची सत्ता काबिज केली हे दिसून येत असले तरी मूळ सत्ताधारी भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारसरणीचे केवळ चार नगरसेवक मनपात आहेत, हे बाब कदाचित सामान्यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडची असू शकते. म्हणूनच की काय सत्ता असूनही भाजपाची म्हणवून घेणारी ही मंडळी शहराच्या विकासकामी अद्यापही भरीव योगदान देऊ शकलेली नाहीत.
एक वर्षांपूर्वी झालेल्या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपाने शून्यापासून सत्तेपर्यंत मजल मारल्याच्या अनेक सुरस कथा सांगितल्या जात असल्याचे ऐकिवात आहेत. लातुरातील राजकारण आता झपाट्याने बदलत जात आहे. आता भाजपाशिवाय पर्यायच नाही, असाही मतप्रवाह हेतूतः सामान्यांपर्यंत पोहोचवला जाताना पाहावयास मिळतो. मात्र, या एक वर्षाच्या कालखंडावर नजर टाकली असता असे लक्षात येते की, लातुरात झालेले हे मनपातील सत्तांतर केवळ नावालाच आहे. लातूर मनपात एकूण ७० जागा आहेत. म्हणजे कोणत्याही पक्षाला सत्ता संपादन करण्यासाठी किमान ३६ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. एक वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकी दरम्यानच्या परिस्थितीचा सारासार विचार केला असता, त्यावेळी मोदी नावाची एक लाट आली होती. लाट नव्हे तर त्याला सुनामी असे संबोधले तरी ते फारसे वावगे ठरणार नाही. त्या लाटेत लोकांनी चेहरा न पाहता फक्त मोदी आणि कमळ पाहिले. त्यामुळे ज्यांना स्वप्नातही आपण लातूर मनपात निवडून येऊ असे वाटले नसेल अशी मंडळी निवडून आली. यावेळच्या मनपा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ७० पैकी तब्बल ४७ चेहरे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. याचाच अर्थ ४७ जणांना मनपाची कार्यपध्दती कशी असते, राजकारण कशाशी खातात याचे कणभरही ज्ञान नाही. तर ७० पैकी १७ जण मागच्या पालिकेतही सदस्य म्हणून निवडून आले होते. मात्र, सुनामी वा वादळ बार बार येत नसतात, याकडेही लक्ष वेधणे गरजेचे आहे.
सत्ताधारी भाजपच्या ३६ नगरसेवकांपैकी तीन जण राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले आहेत. दोन मनसेतून, शिवसेनेतून दोन, समाजवादी विचारसरणीतून एक तर मूळ भाजप-संघ विचारसरणीचे केवळ चार सदस्य निवडून आलेले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले एकूण २४ जण निवडून आलेले आहेत. या सर्व आकड्यांची बेरीज केली तर ३६ पैकी ३२ नगरसेवक आयात झालेले आहेत. त्यांचा मूळच्या भाजप विचारसरणीशी सूतरामही संबंध नाही. कारण त्यांच्या राजकीय जीवनाचा मूळ पायाच काँग्रेस राहिली आहे. आता पायावर इमारतीचा डोलारा अवलंबून असतो की नंतरच्या डागडुजीवर? एवढेही न समजण्याएवढे लातूरकर मुळीच अज्ञानी नाहीत, याबद्दल शंका उपस्थित करण्याचे कारण नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्याही ३३ पैकी ०३ नगरसेवक राष्ट्रवादीतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये आलेले आहेत.
मनपातील ७० नगरसेवकांमध्ये जातीनिहाय संख्याबळ असे आहे : मराठा १५, दलित १३, मुस्लिम ११, येलम १०, लिंगायत ०६, धनगर ०५, ब्राह्मण ०३, अनुसूचित जाती जमातीचे ०२ तर गुरव, मारवाडी, रंगारी, परीट या जातीचा प्रत्येकी एक सदस्य विद्यमान मनपा सभागृहात आहे. वयोगटानुसार संख्याबळाचा विचार करता २१ ते ३० वर्ष वयोगटातील ९ सदस्य सभागृहात आहेत. ३१ ते ४० वयोगटातील २७, ४१ ते ५० वयोगटातील २१, ५१ ते ६० गटातील ०९ तर ६१ व त्यापुढील वयाचे ०४ सदस्य यावेळी निवडून आले आहेत. नगरसेवकांच्या शैक्षणिक पात्रतेवर नजर टाकली असता अशिक्षित सदस्यांची संख्या ०५ आहे. पाचव्या इयत्तेपर्यंत शिकलेले ०७ सदस्य आहेत. दहावी पर्यंत शिकलेल्या सदस्यांची संख्या १९ एवढी आहे. बारावी पर्यंतचे ११, पदवीधर १५ , पदव्युत्तर ०४ , इंजिनिअर ०३, डॉक्टर ०२ तर ०३ सदस्य वकील आहेत. निवडून आलेल्या ३२ सदस्यांचे उत्पन्न त्यांच्या निवडणूक विवरणपत्रात शून्य ते दोन लाख रुपये दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या ३२ नगरसेवकांपैकी १४ जणांचे पॅनकार्डही काढण्यात आलेली नाहीत. मनपा निवडणुकीत सरासरी प्रत्येकाचा निवडणूक खर्च पाच लाख रुपये गृहीत धरला तरी त्यांनी निवडणुकीसाठी पैसे आणले तरी कोठून? असा प्रश्न सुजाण लातूरकरांना पडल्यास नवल वाटू नये. मनपात ०२ ते ०४ लाख उत्पन्न गटात ०८ सदस्य, ०४ ते ०५ लाख उत्पन्न गटात १४ तर ०५ लाखांच्या पुढे उत्पन्न दाखवलेले ०६ सदस्य मनपात कार्यरत आहेत.
विद्यमान सदस्यांमध्ये सर्वाधिक २६ कोटी रुपयांची मालमत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक असलेले राजा मणियार आहेत. त्यांनी ०७ लाख २२ हजार आयकर भरला आहे. त्याखालोखाल. ओमप्रकाश पडिले यांची मालमत्ता १९ कोटी ५३ लाख रुपयांची आहे. त्यांनी आयकरापोटी ०८ लाख ७६ हजार भरणा केला आहे. तर काँग्रेसचेच विक्रांत गोजमगुंडे यांची मालमत्ता १२ कोटी दाखविण्यात आली आहे. ०७ कोटी ५८ लाखांची मालमत्ता दाखविलेले भाजपचे चंद्रकांत बिराजदार हे सर्वात जास्त आयकर भरणारे सदस्य आहेत. त्यांनी मागच्या वर्षी २७ लाख ४४ हजार ७२५ रुपये एवढा आयकर भरला आहे.
विद्यमान लातूर मनपात वडिलांनंतर निवडून आलेल्या सदस्यांची संख्या चार आहे. त्यामध्ये विद्यमान स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, विक्रांत गोजमगुंडे, अजय कोकाटे व मंगेश बिराजदार यांचा समावेश आहे. सासरा नगरसेवक असलेल्या दोन सुना यावेळी मनपात निवडून आल्या आहेत. तर सासऱ्यानंतर जावईही मनपा सदस्य झाला आहे. लातूर शहर मनपाच्या निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचे मनपातील हे वास्तव चित्र आहे. एकूण ७० पैकी इकडून तिकडे तिकडून इकडे या प्रकारात ५४ सदस्य मूळचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी या ना त्या कारणाने संबधित राहिले आहेत. काँग्रेसवाल्याना रस्त्यावर उतरून विकास निधी आणण्याची सवयच नाही. कारण त्यांच्या नेत्यांनी मागण्यापूर्वीच भरीव निधीची तरतूद करून ठेवलेली असायची. आता ही मंडळी भाजपकडून निवडून आली असली तरी एवढ्या लवकर भाजपात रुळू शकणार नाहीत. त्यापैकी किती सदस्य शेवटपर्यंत भाजपात राहतील असाही प्रश्न आतापासूनच उपस्थित केला जात असल्याचे पाहावयास मिळते. लातूर मनपाच्या यशाचे श्रेय घेऊ इच्छिणाऱ्या नेत्यांनी वास्तवाचे भान राखून भविष्यातील वाटचाल केलेली बरी राहील.
Comments