HOME   लातूर न्यूज

किल्लारी, नळेगाव, अंबुलगा साखर कारखाने सुरू करणारः पालकमंत्री

आगामी दिवसात कारखानास्थळी व्यापक बैठकांचे आयोजन होणार


किल्लारी, नळेगाव, अंबुलगा साखर कारखाने सुरू करणारः पालकमंत्री

लातूर: राज्यातील अवसायनात निघालेले सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे. त्यानुसारच लातूर जिल्ह्यातील किल्लारी, नळेगाव व अंबुलगा येथील साखर कारखाने आगामी गाळप हंगामात सुरू करणार असल्याचे सांगून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या संदर्भात तिन्ही कारखानास्थळी लवकरच व्यापक बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. लातूर येथे एका बैठकीत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य यांच्यासह महापौर सुरेश पवार यांची उपस्थिती होती. मागील काळात राज्यात मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने सुरू करण्यात आलेले होते. मात्र यातील काही कारखाने अवसानात निघाले असल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकर्‍यांना अधिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने विविध उपाययोजनांसह वेगवेगळे उपक्रमही सुरू केलेले आहेत. काही महिन्यांपूर्वीच शेतकर्‍यांच्या डोक्यावर असलेला कर्जाचा बोजा उतरावा याकरीता कर्जमाफीही देण्यात आली. आगामी काळात शेतकर्‍यांच्या उत्पादीत मालास अधिकाधिक भाव देऊन त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी राज्य सरकार बांधील आहे असे ते म्हणाले. शेतकर्‍यांचे हित अधिक जोपासले जावे याकरीता काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जे साखर कारखाने अवसायनात निघालेले आहेत ते पुन्हा सुरू करण्यासाठी धोरण ठरवलेले आहे. त्या धोरणाच्या अनुषंगानेच लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना, नळेगाव येथील जय जवान जय किसान साखर कारखाना व अंबुलगा येथील सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात येणार आहे. आगामी गाळप हंगामात या कारखान्याच्या माध्यमातून त्या-त्या कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांचे ऊस गाळप करण्यात येणार आहे. हे साखर कारखाने सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केलेली आहे अशी माहिती पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली.


Comments

Top