लातूर : लातूर जिल्हयाच्या संपूर्ण हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियिम १९५१ कलम ३७ (१)(३) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी ३० एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०.०० ते १३ मे, २०१८ रोजी 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही सडकेवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश कामावरील कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय कर्मचारी, विवाह व अंत्ययात्रा यांना लागू राहणार नाही. सभा, धार्मिक मिरवणूक, मोर्चा, उपोषण यांना परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व संबंधित पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक जिल्हा लातूर यांना राहतील. त्यांनी परवानगी देण्यापूर्वी संबंधित उपविभागीय दंडाधिकारी किंवा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करुन द्यावी. पोलीस खात्याने परवानगी दिल्याची लेखी माहिती त्वरित संबंधित उपविभागीय दंडाधिकारी किंवा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना कळवावे, असेही आदेशान्वये कळविले आहे.
Comments