HOME   लातूर न्यूज

सुरेश धसांसह ०५ जणांचे ०८ अर्ज, कॉंग्रेसचे मोदी गेले परत!

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी! ०८ उमेदवारांचे १२ अर्ज, कॉंग्रेसचे मोदी आले अन गेले!


सुरेश धसांसह ०५ जणांचे ०८ अर्ज, कॉंग्रेसचे मोदी गेले परत!

उस्मानाबाद : उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीकरिता आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार सुरेश धस यांच्यासह ०५ उमेदवारांनी ०८ अर्ज दाखल केले. आतापर्यंत या निवडणूकीत ०८ उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केले आहेत. निवडणूकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून राष्ट्रवादीचे रमेश कराड विरुद्ध भाजपचे सुरेश धस असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीला मात्र बंडाचा धोका असून अशोक जगदाळे, यांची बंडखोरी कायम राहते की संपते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान कॉंग्रेसचे अंबेजोगाई येथील नेते राजकिशोर उर्फ पापा मोदी हेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. त्यासाठी आ. अमर राजूरकर कालच एबी फार्म घेवून उस्मानाबाद मध्ये दाखल झाले होते. आज सकाळी येथील स्वस्तीक मंगल कार्यालयात कॉंग्रेसचे नेते उमेदवारी दाखल करण्यासाठी एकत्र आले असतानाच प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचा निरोप आला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असून परभणीची जागा कॉंग्रेसला सुटल्याने उस्मानाबाद मधून राष्ट्रवादी लढत देईल, त्यामुळे कॉंग्रेसची उमेदवारी दाखल करु नये असे सांगण्यात आले. त्यामुळे पापा मोदी उमेदवारी दाखल न करताच परत गेले.
आज विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. वास्तविक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून फक्त काल आणि आज या दोनच दिवसात ०८ उमेदवारांनी १२ नामनिर्देशन पत्रे दाखल केली. काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश कराड, राष्ट्रवादीचे बंडखोर अशोक जगदाळे व माजलगावचे राल सय्यद अहमद सय्यद नूर यांनी उमेदवारी दाखल केली होती. आज भाजपचे उमेदवार सुरेश धस यांच्यासह रमेश पोफळे, अपक्ष माजलगावचे शेख तौफीक सत्तार, जळकोटचे किसन माधवराव धुळशेट्टे व कॉंग्रेसचे सचिन प्रकाश पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपचे उमेदवार सुरेश धस यांची उमेदवारी दाखल करताना, भाजपच्या नेत्या महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे, बीडच्या खा. प्रितम मुंडे, लातूरचे खा. सुनील गायकवाड, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. सुधाकर भालेराव, आ. भिमराव धोंडे, आ. विनायकराव पाटील, आ. आरटी. देशमुख, आ. संगीताताई ठोंबरे, रमेश आडसकर, माजी आ. गोविंद केंद्रे, रमेश पोफळे, स्वरुपसिंह हजारी, आ. लक्ष्मण पवार, प्रविण घुगे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, शैलेश लाहोटी यांच्यासह भाजपचे लातूर-बीड-उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद सदस्य, पक्षाचे पदाधिकारी, लातूरचे महापौर, उपमहापौर, लातूर-बीड. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदीसह कार्यकर्ते, नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top