लातूर: मागील अनेक वर्षांपासून लातूर येथील लिंगायत समाजाचा स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता. मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढला. स्मशानभूमीची जागा ताब्यात घेतली. याबद्दल लिंगायत समाजाच्या वतीने आयुक्त दिवेगावकर यांचे सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. लातूर शहर व परिसरात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या समाजासाठी स्मशानभूमीच्या जागेची कमतरता होती. आतापर्यंत असणारी जागा अपुरी होती, उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवर अतिक्रमणे झाली होती. यामुळे समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी येत होत्या. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लिंगायत समाजाने पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना साकडे घातले होते. पालकमंत्री निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्या सूचनेनंतर मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेत हा प्रश्न निकाली काढला. अतिक्रमणे हटवून स्मशानभूमीसाठी देण्यात आलेली आरक्षित जागा ताब्यात घेतली. याबद्दल लिंगायत समाजाच्या वतीने आयुक्त दिवेगावकर यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक गुरुनाथ मगे, ॲड. दीपक मठपती, संगीत रंदाळे, शैलेश स्वामी, व्यंकट वाघमारे, महेश कौळखेरे यांच्यासह लिंगायत विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष शरणाप्पा अंबुलगे, मल्लिकार्जुन जवळे, भानुदास डोके, उमाकांत कोरे, सिद्धेश्वर उकरडे, चंद्रकांत मुचाटे, सिद्रामप्पा पोपडे, लक्ष्मीकांत मंठाळे, बंडाप्पा जवळे, विश्वनाथ निगुडगे, बाबुअप्पा सोलापूरे, अक्षय चौंडा उपस्थित होते.
Comments