लातूर: भाजपाची सर्वात मोठी ताकद नागपूरात असून त्यानंतर लातूरमध्ये आहे. नागपूर व लातूरने होऊ घातलेल्या लातूर-बीड-उस्मानाबाद या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुरेश धस यांना साथ दिल्यामुळे बीडचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. लातूर,बीड, उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषद निवडणूकीचे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्ह्यातील भाजपा मतदारांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलत असताना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हा विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायक पाटील, आ. संगीता ठोंबरे, उमेदवार सुरेश धस, माजी आ. साहेबराव दरेकर यांच्यासह लातूर जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, जि.प. अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, बीडचे जिल्हाध्यक्ष रमेश पोफळे, रत्नाकर गुट्टे आदींची उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली असून राज्यात नागपूर नंतर लातूरमध्येच सर्वांधिक सत्ताकेंद्रे भाजपाच्या ताब्यात असल्याचे सांगून मुंडे म्हणाल्या की, या सत्ताकेंद्रामुळेच होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक भाजपाला जिंकण्याची संधी प्राप्त झाली आहे. या निवडणुकीबाबत लातूर व बीड मध्ये अविश्वसाचे वातावरण असल्याचे चित्र रंगविण्यात आले असले तरी यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आपणास शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र रमेश कराड यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे या पक्षाची मोठी नामुष्की झाल्याचे सांगुन पंकजा मुंडे म्हणाल्या की, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोणतीही आकडेवारी सांगण्यात येत असली तरी प्रत्यक्षात मात्र भाजपाची स्थिती मजबूत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची साथ मिळत असल्यामुळे बीडच्या सुरेश धड यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूरची बीडला साथ मिळणार असून उस्मानाबाद मधूनही मदत मिळवून देण्याची हमी देऊन आम्ही दिलेला शब्द पाळतोच असे स्पष्ट केले. या निवडणुकीसाठी भाजपाचे सर्वाधिक मतदार लातूर जिल्ह्यात असून भाजपाच्या मतदानासोबत आघाडी, अपक्ष यांच्यासह वेगवेगळ्या पक्षातील मतदाराचे मतदानही भाजपाच्या पारड्यात कसे पडेल याबाबत आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या प्रयत्नांना निश्चितच यश मिळेल याला कारण म्हणजे जिल्ह्यात आम्ही नेहमीच सहकार्याची भुमिका घेतल्यामुळे विरोधी पक्षाचे मतदार आपल्याला निश्चितच मतदान करतील अशी ग्वाही पालकमंत्री निलंगेकरांनी यावेळी दिली. ही निवडणुक जाहीर झाल्यापसून प्रसिद्धी माध्यमासह सोशल मिडियामधून अनेक चर्चा झाल्या असून त्यात कोणतेच तथ्य नव्हते असे सांगून पक्षाला अधिक मजबुत करण्यासाठी आम्ही कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीत आ. सुधाकर भालेराव, आ. संगिता ठोंबरे, आ. विनायक पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे तर सुत्रसंचलन गुरुनाथ मगे यांनी केले. आभार प्रदर्शन शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी केले.
Comments