HOME   लातूर न्यूज

पराभूत १३५ उमेदवार निवडणूक लढविण्यास ३ वर्षासाठी अपात्र


पराभूत १३५ उमेदवार निवडणूक लढविण्यास ३ वर्षासाठी अपात्र

लातूर : एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या लातूर शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांतर्फ़े व अपक्ष म्हणून मैदान गाजविलेल्या तब्बल १३५ उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब विहित कालावधीत सादर केला नाही. विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाराचा वापर करून पराभूत १३५ उमेदवारांना पुढील ३ वर्षासाठी महापालिकेचा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. विभागीय आयुक्तांचा दि.२५ जानेवारी २०१८ रोजीचा हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या राज्यपत्रात उमेदवारांच्या नावानिशी प्रसिद्ध झाला आहे. लातूर शहर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक दि. १९ एप्रिल २०१७ रोजी एकूण १८ प्रभागांमध्ये ७० जागांसाठी घेण्यात आली. प्रभाग क्र.१ ते १६ मध्ये अ, ब, क, ड, अशा प्रवर्गनिहाय मतदारसंघामध्ये झाली. या निवडणूकीसाठी एकूण २०५ उमेदवारांनी दंड थोपटले होते. निवडणुकीत उभ्या टाकलेल्या उमेदवारांनी ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब महापालिका आयुक्त वा उपायुक्त दर्जापेक्षा कमी नसलेल्या व आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍याकडे सादर करणे बंधनकारक होते.निकालानंतर विजयी झालेल्या ७० सदस्यांनी आपला खर्चाचा हिशोब सादर केला. मात्र, पराभूत झालेल्या उमेदवारांनी हिशोबच सादर केला नाही.


Comments

Top