लातूर: लातूर शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा करता यावा म्हणून केंद्र शासनाने अमृत अभियान योजनेअंतर्गत योजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. पण, कंत्राट्दाराने संथगतीने काम केल्याने हे काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे या कंत्राटदाराला आता दंडासह तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तीन महिन्यांत साडेतेरा लाखांचा दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा करता यावा म्हणून केंद्र शासनाने लातूरसाठी २०१६ मध्ये ४६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. त्यानंतर या योजनेचे काम सुरू करण्यात आले. पहिल्या दीड वर्षात तर केवळ वीस ते पंचवीस टक्केच कान झाले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी या कामाने वेगही घेतला आहे. आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे . यात १४५ किलोमिटर पाइपलाइनचे काम झाले आहे. क्रॉस कनेक्शनही जोडली जात आहेत. सर्वत्र सारख्या दाबाने पाणी यावे याकरिता प्रयन्त केले जात आहेत. गळती, दुरूस्तीसाठी स्काडा सिस्टीमचाही वापर केला जाणार आहे, अशी माहिती दिवेगावकर यांनी दिली.
Comments