लातूर: लातूर शहरात महानगरपालिकेकडून अशुध्द, गढूळ, दुर्गंधयुक्त्त पाणीपूरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकंकडून होत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असुन सत्ताधारी मंडळींना वेळ नसेल तर किमान प्रशासनाने तरी तातडीने लक्ष घालून जनतेच्या आरोग्याशी होत असलेला खेळ थांबवावा असे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे. मागची दोन वर्षे तीव्र पाणी टंचाईची झळा सोसलेल्या लातूरकरांना यावर्षी धरणात भरपूर पाणीसाठा असूनही महापालिकेकडून अत्यंत गढूळ, दुर्गंधीयुक्त, अशुध्द पाणी पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात बुधवारी अनेक नागरिकांनी पाण्याचे नमुने सोबत घेवून येऊन आमदार अमित देशमुख यांच्याकडे तक्रारी केल्या. महापालिकेत यासंदर्भात तक्रार करण्यास गेलो असता तेथे कोणीही दखल घ्यायलाही तयार नसल्याचे या नागरिकांनी आमदार देशमुख यांना सांगितले.
भाजपच्या हाती महापालिकेची सत्ता दिल्यास पहिल्या वर्षी आठवडयातून दोन वेळा आणि दुसऱ्या वर्षापासून दररोज २४ तास पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन या पक्षाच्या जाहिरनाम्यात देण्यात आले होते. भाजपला महापालिकेत सत्ता मिळवून आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात आठवडयातून दोन वेळा नव्हे तर दोन आठवडयातून एकदा पाणी पुरवठा होऊ लागला आहे. मुळात पाण्याचे वेळापत्रकच पाळले जात नाही. त्यात मे महिन्याच्या कडक उन्हात शहरात अशुध्द पाणी पुरवठा सुरु झाला आहे. या पाण्यामुळे नागरिकांना अनेक आरोग्यांच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत शहरात गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे या संदर्भात नागरिक महापालिकेत तक्रार करण्यासाठी गेले असता, सत्ताधारी असलेल्या भाजपचे पदाधिकारी सहलीवर गेले असल्याचे त्यांना समजले. त्यांनतर नागरिकांनी आमदार देशमुख यांची भेट घेवून आपले गाऱ्हाणे मांडले. यासंदर्भात बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करुन पदाधिकाऱ्यांनी सहलीवर जाणे योग्य नाही. पदाधिकाऱ्यांना नागरी समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नसेल तर किमान प्रशासनाने तरी या बाबत लक्ष घालणे गरजेचे आहे. प्रशासनाशी आपण तातडीने बोलणार असून त्यांच्या काही समस्या असतील तर त्या सोडविण्यासाठीही सहकार्य केले जाईल मात्र नागरिकांना शुध्द पाणी पुवठा करण्यासाठी त्यांनी युध्द पातळीवर कार्यवाही करणे गरजेचे आहे.
Comments