HOME   लातूर न्यूज

भाजपा हारु शकते, अखेर सत्य जिंकले!

आ. अमित देशमुख यांची प्रतिक्रिया


भाजपा हारु शकते, अखेर सत्य जिंकले!

लातूर: कर्नाटक राज्यातील सद्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेता ‘अखेर सत्य जिंकले’ असेच म्हणावे लागेल अशी संयमित प्रतिक्रिया अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षही हारू शकतो हे या एकूण घडामोडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने दाखवून दिले आहे असेही ते म्हणतात. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालेले नसतानाही केंद्रातील सत्तेचा दुरूपयोग करून भारतीय जनता पक्ष कर्नाटकात सत्तारूढ झाला होता. यातून लोकशाही मुल्यांची पायमल्ली झाल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण झाली होती. गोवा, मणिपूर, मेघालय या राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळालेल्या तेथील राज्यपालांनी काँग्रेसला डावलून भाजपच्या निवडणुकीनंतरच्या आघाडीला प्राधान्य देत सरकार बनवण्यासाठी पाचारण केले होते. बिहारमध्येही राष्ट्रीय जनता दलास डावलून भाजपच्या आघाडीला प्राधान्य दिले. भाजपाने जे देशात पेरले तेच आता कर्नाटकात उगवले आहे. या न्यायाने कर्नाटकात काँग्रेस-जेडीयू आघाडीला राज्यपालांनी सरकार स्थापन्यासाठी प्राधान्य देण्याऐवजी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला पाचारण केले व बहुमत सिध्द करण्यासाठी ७ दिवसाची वेळ मागीतली असताना १५ दिवसांची मुदत बहाल केली. राज्यपाल आणि केंद्रातील भाजप सरकारच्या पक्षपाती धोरणाच्या विरोधात काँग्रेस व जेडीयू आघाडीने न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र योग्य न्याय करीत बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली १५ दिवसांची मुदत रद्द करून फक्त २ दिवसात विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश दिला, न्यायमंदिरातून आलेल्या या आदेशामुळे लोकशाहीचे संरक्षण झाले असून भारतीय जनता पक्षाचे मनसुबे उधळले गेले आहेत. लोकशाही आणि न्यायालय यापेक्षा कोणीही मोठे नाही हे कर्नाटकातील सध्याच्या घडामोडीतून पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. ठोकशाही मार्गाने सत्तारूढ झालेले भाजप पायउतार झाल्याने कर्नाटकच्या जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेस-जेडीयू आघाडीचे सरकार स्थापन होईल आणि विकासाची प्रक्रिया पुर्वीप्रमाणेच गतिमान होईल असा विश्वास आहे. काँग्रेस व जेडीयु पक्षाचे जेष्ठ नेते व कर्नाटकातील जनतेने मागच्या तीन चार दिवसात संघटीतपणे लोकशाही मार्गाने न्यायालयीन लढा लढला आहे. तो कौतुकास्पद आहे, या लढाईत अखेर सत्याचा विजय झाला असून लढाईतील सर्व सहभागी घटकांचे मी अभिनंदन करतो, असेही शेवटी आमदार अमित विलासराव देशमुख म्हणतात.


Comments

Top