लातूर: दैनिक प्रतिव्यवहारचे संपादक राजकुमार प्रभुअप्पा मुनाळे यांच्या अकाली निधनाबद्दल लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी पत्रकारभवनात भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपादक राजकुमार मुनाळे यांना दोन मिनीटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बोलताना जयप्रकाश दगडे यांनी राजकुमार मुनाळे यांच्या रुपाने एक उमदा पत्रकार आपण गमावला, मुनाळे परिवाराच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. पत्रकारितेचे काम करताना ताण-तणावात करावे लागते. भोजन, झोप यात कमालीची अनियमितता असते, व्यायामाचा अभाव यामुळे आपल्या काम आणि शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत, या साचेबध्द जीवनप्रणालीतून आपल्याला थोडीसी उसंत मिळाली पाहिजे. पत्रकारांनी आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असून, त्यासाठी जिल्हा पत्रकार संघाने आरोग्य विषयक कार्यशाळा घ्याव्यात, अशी सूचना यावेळी केली. दीपरत्न निलंगेकर यांनी राजकुमार मुनाळे यांनी डीटीपी ऑपरेटर, पत्रकार,संपादक, प्रकाशक, मालक अशा सर्व भूमिका लिलया निभावल्या ते परिपूर्ण पत्रकार होते, असा माणूस लातूरच्या पत्रकारितेत झाला नाही असे सांगून आपल्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षीय समारोपा नरसिंग घोणे यांनी आगामी काळात पत्रकार कल्याण व आरोग्य विषयक कार्यशाळा व इतर उपक्रम घेण्यात येतील, त्याचा सर्वांना लाभ घ्यावा असे आवाहन करुन मुनाळे परिवाराच्या दुःखात जिल्हा पत्रकार संघ सामील असल्याचे सांगितले. याप्रसगी हरिश्चंद्र जाधव, लिंबराज पन्हाळकर, काकासाहेब घुटे, सुधाकर फुले, मुरलीधर चेंगटे, सिध्देश्वर सोमवंशी, गोविंद सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, पंडीत हणमंते, चंद्रकांत कातळे, शिवाजी राऊत, प्रकाश सूर्यकर, उमाकांत उफाडे, धर्माधिकारी, परळकर, बाळ होळीकर, नितीन चालक यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
Comments