लातूर: लातूर शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी विषयक समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेल्यास रस्त्यांवर उतरण्याचा इशाराही आला आहे. वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लातूर शहरात वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या साधारणतः दीड लाखांपेक्षा अधिक आहे. या समाजाची अंत्यविधीची अडचण दूर करण्यासाठी स्मशानभूमीसाठी जागा मिळवण्यासाठी समाजाला सातत्याने संघर्ष करावा लागला आहे. या संघर्षातून आर्वी व सिद्धेश्वर मंदिरासमोर अशा दोन ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कन्हेरी येथे लिंगायत स्मशानभूमीसाठी ०३ एकर २० गुंठे जमीन खरेदी करण्यात आली असून अद्यापपर्यंत ती वीरशैव लिंगायत समाजाला देण्यात आलेली नाही. ती जमीन त्वरित समाजाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
आर्वी येथे स्मशानभूमीसाठी देण्यात आलेल्या जागेवर जाण्यासाठी अतिशय अरुंद रस्ता आहे. प्रेत खांद्यावर घेऊन जाणेही अशक्य आहे. हा रस्ता व्यवस्थित करून देण्यात यावा, या स्मशानभूमीची संरक्षक भिंत मोडकळीस आली आहे, ती नव्याने बांधून देण्यात यावी, स्मशानभूमीतील शेड गायब असल्याने त्वरित शेड उभारण्यात यावे, सिद्धेश्वर मंदिर समोर स्मशानभूमीसाठी देण्यात आलेली एक एकर एक गुंठा जागा अपुरी आहे. तसेच या जागेच्या स्मशानभूमीची कामे मागच्या तीन चार वर्षांपासून प्रलंबित राहिली आहेत. स्मशानभूमीला संरक्षक भिंत नसल्याने जनावरे आत शिरून प्रसंगी प्रेताची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जागेवर असलेला हॉल विश्रांती स्थळ म्हणून उपयोगात आणला जातो. परंतु हा हॉल इतर समाजाला हस्तांतरित करण्याचा मनपाचा विचार असल्याचे समजते. हा हॉल अन्य समाजाला हस्तांतरित करण्यात येऊ नये, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता मनपा प्रशासनाने घ्यावी, स्मशानभूमीची संरक्षक भिंत त्वरित बांधून द्यावी, पावसाळ्यात या जागेत पाणी साचत असल्याने अंत्यविधी करतांना अडचणी येतात. या जागेपैकी एक इंचही जागा अन्य समाजाला देण्यात येऊ नये, अन्यथा लिंगायत समाजाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही सदर निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर पाचशेघर मठ संस्थानचे कार्यवाह सिद्धलिंगप्पा टेंकाळे, वीरशैव समाजाचे कार्याध्यक्ष काशिनाथप्पा पंचाक्षरी, रेणुकाचार्य चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधरप्पा हामणे, महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष बसवंत भरडे, लिंगायत एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रा. संगमेश्वर पानगावे, वीरशैव लिंगायत समाज संस्थेचे अध्यक्ष रामलिंगप्पा ठेसे, लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक प्रा. पुष्पराज खुब्बा, राजेश्वर डांगे, भीमाशंकर अंकलकोटे, प्रा. मन्मथ पंचाक्षरी, सुरेश दोशेट्टी, भालचंद्रप्पा मानकरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments