लातूर: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी,पुणे, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे आणि मानवतातीर्थ रामेश्वर (रुई), ता. जि. लातूर येथील जामा मस्जिद व समस्त मुस्लिम बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ०३ जून ते शनिवार ०९ जून २०१८ या कालावधीत पवित्र कुराण सप्ताह (दर्स-ए-कुरान) चे रामेश्वर (रुई) येथे संपन्न होत आहे. या सप्ताहाचा समारोप समारंभ ०९ जून २०१८ रोजी सकाळी ९.३० वा. होणार आहे. या समारंभासाठी हैद्राबाद येथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाचे कुलपती फिरोज बख्त अहमद हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व पवित्र कुराण सप्ताहाचे संयोजक डॉ. एसएन पठाण यांनी पत्रकार परिषदेत येथे दिली. माईर्स एमआयटी, लातूर येथे गुरुवार ०७ जून रोजी ‘पवित्र कुराण सप्ताह (दर्स-ए-कुरान)’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. एसएन पठाण बोलत होते. यावेळी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, मुफ्ती सय्यद ओवैस कासमी साहब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. एसएन पठाण म्हणाले, पवित्र दर्स-ए-कुरान सप्ताहात संपूर्ण सात दिवस सहभागी झालेल्या सर्व साधकांना आणि पवित्र कुराण मुखोद्गत असलेल्या सात हाफिजांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पवित्र कुराणाचा सामाजिक आशय सांगणार्या इस्लाम धर्माच्या नित्य नमाजी लोकांचा समारोप समारंभात शाल व पवित्र कुराणाची प्रत देऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
Comments