HOME   लातूर न्यूज

लातुरातील नळांना तातडीने मीटर बसवा

पाणी पुरवठ्याचे नियोजन करा, जलयुक्त लातुरच्या पदाधिकार्‍यांची मागणी


लातुरातील नळांना तातडीने मीटर बसवा

लातूर: भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसलेल्या लातूरवासियांना मुबलक पाणीसाठा असूनही अद्याप पर्यंत पुरेशा प्रमाणांत पाणी पुरवठा केला जात नाही. पाणी पुरवठ्याबाबतचे योग्य नियोजन करून शहरांत तातडीने प्रायोगिक स्तरांवर नळांना मीटर लावून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जलयुक्त लातूरच्या पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.
जलयुक्त लातूरच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.अशोकराव कुकडे व अॅड. मनोहरराव गोमारे यांच्या नेतृत्वाखाली लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी लातूरच्या पाणी पुरवठ्यासंदर्भांत सविस्तरपणे चर्चा केली. लातूरकरांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मांजरा नदीच्या पुनर्जीवनाचे कार्य लोकसहभागाच्या माध्यमातून करण्यात आले. परिणामतः आज मांजरा धरणांत पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. असे असतांनाही लातूरकरांना आठवड्यातून केवळ एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने पाण्याची गरज भागविण्यासाठी पुन्हा विंधनविहीरींच्या सहाय्याने पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे शाश्वत असलेला पाणीसाठा संपून पाणी पातळी पुन्हा खोलवर जाताना दिसते आहे. याबाबींवर चर्चा करून जलयुक्त लातूरच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पुढील महत्वपूर्ण सूचनावजा मागण्या केल्या आहेत. शहरातील प्रत्येक नळाला मीटरप्रमाणे योग्य दरात पाणीपुरवठा व्हावा, मीटर यंत्रणा परिपूर्ण होईपर्यंत आठवड्यातून किमान दोन वेळा पाणीपुरवठा करावा, शहरात तातडीने प्रायोगिक स्तरांवर आदर्श कॉलनी किंवा मनपा प्रशासनास योग्य वाटेल त्या भागात मीटर यंत्रणा चालू करून नियमित पाणी पुरवठा सुरु करावा, जेणेकरून तो प्रयोग लातूर शहरातील इतर भागातील नागरिकांसाठी सुरळीत व नियमित पाणीपुरवठ्याचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरेल व सर्वांना नळाला मीटर बसविण्याची प्रेरणा मिळेल, एकंदर ही मीटर यंत्रणा उत्कृष्ट दर्जाची व सर्वसामान्यांना परवडणारी असावी, या योजनेसाठी जलयुक्त लातूरसह इतर सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते जनजागृती करण्यास तयार आहेत शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उद्योग व बांधकाम, वृक्ष संवर्धन आदी कार्यात उपयोग करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, शहरातील मोठे हॉटेल, लॉज, दवाखाने यांना सांडपाणी पुनर्वापर करून ते शौचालय व फ्लश साठी वापराचे सक्तीचे करावे या मागण्यांचा समावेश आहे.
जलयुक्त लातूरच्या पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या या सूचनांचे मनपा आयुक्तांनी स्वागत करून त्यावर योग्य ती कृती करण्याचे आश्वासन दिले आहे. या निवेदनांवर डॉ. अशोकराव कुकडे, मकरंद जाधव, मनोहरराव गोमारे, बी.बी. ठोंबरे, शिवदास मिटकरी, सुनील देशपांडे, अरुण डंके , प्राचार्य डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Comments

Top