HOME   लातूर न्यूज

तेराशे रुपयांची लाच घेताना शिऊरची तलाठी जाळ्यात


तेराशे रुपयांची लाच घेताना शिऊरची तलाठी जाळ्यात

शेत जमिनीचा फ़ेर करण्यासाठी १ हजार ५०० रूपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १३०० रूपये स्वीकारताना शिऊर (ता. लातूर) येथील महीला तलाठी रेणुका शिवाजी पुरी यांना गुरूवारी (दि.२१ ) दुपारी रंगेहाथ अटक करण्यात आली. शिऊर येथील गट नं ११७/१ मधील खरेदी केलेली शेत जमीन तक्रारकर्त्यांच्या वडिलांच्या नावे फ़ेर करून घ्यावयाची होती. यासाठी वारंवार मागणी करूनही शिऊर सज्जाच्या तलाठी रेणुका शिवाजी पुरी (३१) या फ़ेर करून देत नव्हत्या. या कामासाठी त्यांनी १ हजार ५०० रूपयांच्या लाचेची मागणी केली, परंतु तडजोडीअंती श्रीमती पुरी यांनी दोनशे रूपये कमी केले आणि १ हजार ३०० रूपये देण्याचे ठरले. तक्रारकर्त्यास लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुरुवारी दुपारी लातूर शहरातील इंडियानगर परिसरात असलेल्या श्रीमती पुरी यांच्या तलाठी सज्जा कार्यालयात सापळा लावण्यात आला. यावेळी श्रीमती पुरी यांनी पंचासमक्ष १ हजार ३०० रूपये स्वीकारले आणि त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


Comments

Top