HOME   टॉप स्टोरी

बोरीसह पाच गावात ग्रामीण पोलिसांची दहशत; कलेक्टर, एसपींकडे तक्रार

फिर्यादींनाच वेठीस धरतात, अवैध धंद्यांना अभय देतात, गुन्हेगारांना सोडतात मोकाट!


लातूर: बोरीसह पाच गावात ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांचीच दहशत निर्माण झाली असून गुन्हेगारांना मोकाट सोडले जाते, फिर्यादींवरच गुन्हे दाखल केले जातात, निवेदन विनंत्यांची दखल घेतली जात नाही, अवैध धंदे करणार्‍यांना पाठीशी घातले जाते अशी तक्रार जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
बोरी, बिंदगीहाळ, मुशिराबाद, सलगरा, उंबरगा आणि बोकनगाव या पंचक्रोशीतील पाच गावात अवैध धंदे बोकाळले आहेत. गुन्हेगारांविरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता निर्दोषांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जातो. काही दिवसांपूर्वी एका पानटपरी चालकाला अटक करुन नेण्याचा प्रयत्न झाला, चौकशी केली असता हिंदू-मुस्लीम भांडणाची केस आहे असे उगाच सांगण्यात आले. बोरीमध्ये तर असा प्रकार केव्हाच घडला नाही, असला तरी आम्ही मिटवून घेतो असे सांगितले. आजवर केलेल्या अर्ज विनंत्यांचं काय झालं असा प्रश्न आम्ही केला, आम्हीच अवैध दारु पकडून दिली तर आमच्यावरच केस करण्याची धमकी पोलिस देतात. मुशिराबादेत भर चौकात अवैध दारु विकली जाते, आम्ही पोलिसांना हप्ते देतो काय करायचे ते करुन घ्या असे सरळ धमकावले जाते त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांना आम्ही तक्रार दिली अशी माहिती उप सरपंच फरमान शेख, सुरेश पाटील
आणि पुंडलिक बेंबडे यांनी दिली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मिलींद खोडवे यांच्याकडे विचारणा केली असता या पाच गावातून अवैध धंदे करणार्‍यांवर वेळोवेळी कारवाई केली. प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या आहेत असे त्यांनी सांगितले.


Comments

Top