रवींद्र जगताप, लातूर: सांस्कृतिक क्षेत्रात लातुरने मोठं नाव कमावलं आहे. एकेकाळी महाराष्ट्रात या क्षेत्रात लातुरची दादागिरीही होती. श्रीराम गोजमगुंडे, प्रा. रवींद्र गोवंडे, प्राचार्य पुरोहित, विभाकर मिरजकर, अगदी अलीकडे बाळकृष्ण धायगुडे, सुनिता कुलकर्णी, शैलेश गोजमगुंडे, मोहन माने अशी आता मोजकीच नावे घेता येतील. नव्या नाट्यगृहाला वाजपेयींचं नाव दिल्यानं ही सांस्कृतिक चळवळ वृद्धींगत होणार आहे का? वाजपेयी भारतरत्न आहेत. त्यांना कोण ओळखत नाही? पण श्रीराम तात्यांचं कौतुक आपल्यालाच करावं लागेल. लातुरच्या कलावंतांना त्यामुळं बळ मिळणार आहे. ठराव आधी संमत झाला म्हणून ही राजकारणी मंडळी सगळ्यांची इज्जत का काढत आहेत? नावाच्या राजकारणाआडून विक्रांत गोजमगुंडे यांच्यावर हल्ले करुन आसुरी आनंद का घेत आहेत? घाणेरडे शब्द प्रयोग करुन त्यांना बदनाम का करीत आहेत? असे प्रश्न पडत आहेत.
काल भाजपच्या लोकांनी मनपासमोर निदर्शने केली. धरणे धरली. महापौरांना म्हणाले आयत्या बिळात नागोबा, चमको महापौराचा धिक्कार असो, व्हाट्सअॅप महापौर हाय हाय, लबाड लांडगं ढोंग करतंय, विकास केल्याचं सोंग करतंय! वाद काय अन अन बोलताय काय? प्रश्न काय अन चाललंय काय? सत्ता भोगलेल्यांना त्याची किंमतच कळालेली नाही. त्यामुळं चांगल्या प्रश्नांचं वाटोळं होत चालललंय आणि लोकात हसं होत चालललंय. यात कुणाचीच गेली कळत नाही. म्हणे वाजपेयींच्या नावासाठी आणखी तीव्र आंदोलन करणार आहेत यामुळं लातूर सांस्कृतिक चळवळीच्या शिखरावर पोचणार असेल तर आम्ही ट्रम्पचंही नाव द्यायला तयार आहोत असं सांस्कृतिक क्षेत्रातली मंडळी खेदानं म्हणतात!
Comments