HOME   टॉप स्टोरी

एका वादळी व्यक्तिमत्वाची अखेर

'आजलातूर' या मराठवाड्यातील पहिल्या वेब पोर्टल न्यूज चॅनलचे संपादक, पत्रकार, रंगकर्मी रविंद्र जगताप यांचे निधन


एका वादळी व्यक्तिमत्वाची अखेर

''मित्र हो नमस्कार, मी रविंद्र जगताप''
आता हा आवाज ऐकू येणार नाही.

जन्म: २२ फेब्रुवारी १९६७.
माजी शिवसेना नगरसेवक कै. भगवानराव जगताप यांचे ज्येष्ठ सुपुत्र. विज्ञानाविषयी प्रचंड कुतूहल, आवड. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी लातुरातील व्यंकटेश शाळेतून पूर्ण केले. शाहू कॉलेज मध्ये बीएससी अर्धवट सोडून पत्रकारितेचे ध्येयवेड साकारले. पत्रकारितेच्या क्षेत्रात पदार्पण केले तेंव्हा त्यांनी पत्रकारितेची कोणतीही पदवी संपादन केलेली नव्हती. अनेक वर्षे यात काम केल्यानंतर त्यांनी मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी ( बी.जे.) आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (एम. जे.) संपादन केली.
रविंद्र जगताप यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात सिद्धेश्वर समाचार या दैनिकातून केली. या दैनिकाची लातूर आवृत्ती, तसेच तुळजापूर आवृत्तीत त्यांनी काम केले. यानंतर दैनिक भूकंप मध्येही ते काही वर्षे कार्यरत होते. सुरुवातीच्या काळात दैनिकाचे काम खिळ्यांच्या प्रिंटिंग प्रेसवर चालत असे. अनंत भालेराव यांच्या दैनिक मराठवाडाची लातुरातून आवृत्ती सुरू झाली. सी. आर. ट्रॉनिकवर या दैनिकाचे काम चालायचे. त्या दैनिकाच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करण्यासाठी औरंगाबादच्या मराठवाडा दैनिकात त्यांनी तीन महिन्याचे खास प्रशिक्षण यासाठी घेतले होते.
यानंतर लातुरात दैनिक मराठवाडाच्या संपादकीय विभागात सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. लातूर आवृत्ती बंद पडल्यानंतर त्यांनी औरंगाबाद आवृत्तीसाठी लातूर शहर प्रतिनिधी म्हणून काही काळ काम पाहिले. दैनिक एकमतच्या प्रारंभ काळापासून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. महारुद्र मंगनाळे यांच्या मुक्तरंगमध्येही त्यांनी काही वर्षे काम केले.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जमाना वेगाने सुरू झाला तेव्हा "सहारा समय", " आज तक" या राष्ट्रीय हिंदी चँनलसाठी त्यांनी लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. हे काम करत असतानाच स्वतःचे वेब पोर्टल सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. असे प्रयोग पुण्या, मुंबईत सुरू होते. मराठवाड्यात प्रथमच त्यांनी 'आजलातूर' या नावाने वेब पोर्टल सुरू केले. त्या आधी त्यांनी मोबाईल दैनिक सुरू केले. 'नेटवाणीच्या' माध्यमातून लोकांना लातूरच्या बातम्या मोबाईल वर उपलब्ध करून दिल्या. 'आजची बातमी आज कशाला उद्याची बात' असे ते म्हणत असत. देशात आणि देशाबाहेर काय सुरु आहे हे आपल्याला टीव्हीवरती लगेच समजते परंतु आपल्या बाजूच्या चौकात झालेली मोठी घटना समजण्यासाठी आपल्याला दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्राची वाट पाहावी लागते. हा इन्फॉर्मशन गॅप भरून काढण्यासाठी, दररोज घडणाऱ्या घडामोडींची लोकांना माहिती व्हावी यासाठी त्यांनी 'संवाद एसएमएस सेवा' सुरू केली. या सेवेमुळे पोलीस, प्रशासनाला, गरजू लोकांना प्रचंड मदत झाली, अनेक दुर्घटनाही थांबल्या, कामे वेळेच्या आत होऊ लागली. हा सर्वस्वी वेगळा प्रयोग होता. अनेकांनी याबाबत शंका घेतल्या. याने काय साध्य होणार अशी विचारणा केली. यातून काय उत्पन्न मिळणार असा सवालही केला. पण पैसा हा त्यांच्यासाठी गौण मुद्दा होता. लोकांना सतत महत्वाच्या घडामोडी समजल्या पाहिजेत हा विचार यात प्रामुख्याने होता. ते नेटवाणीच्या बातम्याही अनेकांना भेटून दाखवत. त्यावेळीही अनेकांनी त्यांची नीट दाखल घेतली नाही. पण त्यांनी आपला प्रयत्न सोडला नाही. हळूहळू लोकांना या बातम्यांची, एसएमएसची सवय लागली. यानंतर आजलातूर या वेब पोर्टल ने तर लोकांना बातम्यांबरोबरच विविध ठिकाणचे फोटो पाहण्याची सवय लागली. आजलातुरची बातमी म्हणजे खात्रीशीर वृत्त हे समीकरण जुळुनच गेले होते. एखाद्या वृत्ताबद्दल अफवा असेल तर तिची खात्री आजलातूरवर केली जायची.
व्हिडिओ बातम्यांबरोबरच काही लाईव्ह बातम्यांचे वेगळेपण त्यांनी जपले. अनेकांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी मुलाखती घेतल्या. एखाद्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेल्या कार्यक्रमाच्या बातमीला प्राधान्य देण्यापेक्षा त्यांनी अनेक गरजू, पिचलेल्या, रंजल्या गांजलेल्याच्या अन्यायाला, समस्येला,प्रश्नांना समोर आणले. सामाजिक भान त्यांनी आपल्या पत्रकारितेत जपले. एखादी गोष्ट पटली तर ते मनापासून स्वीकारायचे. न पटणाऱ्या गोष्टींना ते बेधडक धुडकावून लावायचे. अत्यन्त परखडपणे ते आपली प्रतिक्रिया द्यायचे. यावेळी ते कोणाचीच गय करायचे नाहीत. अन्याय करणारा कोणी कितीही मातब्बर असला तरी ते बातमी करायचे. बातमी दडपणे त्यांच्या स्वभावात नव्हते. बातमी न येण्यासाठी कोणी कितीही दबाव आणला तरी त्यांच्या समोर कोणाचे काही चालायचे नाही. यासाठी त्यांनी अनेकांचे शत्रुत्व पत्करले आहे. पाणी, पर्यावरण, वृक्षसंवर्धन, लातुरची रेल्वे असे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. बडे लोक, राजकीय नेते यापेक्षा सामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आणण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न असत.
त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण शाहू महाविद्यालयात झाले. टेबल टेनिस हा त्यांचा आवडता खेळ. एकांकिका लिहिणे, त्या बसवणे यात ते रमत. 'पडघम' नावाने त्यांनी सामाजिक विषयावर विविध नाटके सादर केली. युथफेस्टिवलमध्येही त्यांनी अनेक एकांकिका बसविल्या आहेत. लातुरात पथनाट्याची सुरुवात त्यांनी केली. महाविद्यालयातील मित्रांना बरोबर घेऊन त्यांनी बसवलेल्या पथनाट्या चे २० प्रयोग त्यांनी शहरात ठिकठिकाणी केले. एक प्रयोग त्यांनी बाबा आमटे यांच्या समोर केला.
ते बाबा आमटे यांच्या आनंदवनातील श्रम शिबिरातही सहभागी झाले होते. लातुरातील नाट्य क्षेत्रातही त्यांनी अनेक एकांकिका लिहून बसवल्या आहेत.बेंडे एकांकिका स्पर्धेतही त्यांचा सहभाग असायचा. नंतरच्या काळात प्रा. रवींद्र गोवंडे सरांच्या बरोबर रंगमंच या संस्थेच्या माध्यामातून १७ वर्ष शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात सक्रिय सहभागी होते.
लातुरात प्रशासनाशी झगडून त्यांनी अनेक प्रश्न बेधडकपणे मांडले, सोडवले. बेधडक, फटकळ स्वभावामुळे अनेक माणसे आयुष्याच्या प्रवासात नाराज पण झाली.
26/11/2008 या दिवशी भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला गेला होता. यावेळी मुंबईवरून लातूरकडे निघालेले जगताप यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळील चित्रण केले होते.

लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते लातूर भूषण पुरस्कार, एमआयटी आणि माईर्सतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय ‘जनजागरण रत्न’ पुरस्कार, लोकशाहीचा चौथा स्तंभ पुरस्कार, शाळेच्या वतीनं व्यंकटेश भूषण पुरस्कार अश्या अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित होते.
तामिळनाडुतील अन्नामलाई विद्यापीठात आंतरराज्य अभिनय स्पर्धेत गोल्ड मेडल्सने ते सन्मानित होते.
लातुरात पाण्याच्या प्रश्नांवर त्यांनी अहोरात्र काम केले. ते सुकाणू समितीचे समन्वयक होते.
लातूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे ते काही काळ सदस्य होते.
२५ डायलिसिस, ५ डॉक्टर्स , ३ महिन्यांपासूनचा आयसीयूतील संघर्ष अखेर थांबला.
भावपूर्ण श्रद्धांजली.

आजलातूर परिवाराकडून एक विनंती: रविंद्र जगताप यांचे आपल्याकडील काही फोटो, आठवणी असतील तर aajlatur@gmail.com वर नक्की पाठवा.
सोशल मीडियावर शोकसंदेश देणारे मान्यवर, मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक, प्रखर आणि सत्य लिखाणामुळे नाराज असणाऱ्या मंडळींनीही भरभरून कौतुक केलेले पाहायला मिळाले. सर्वांचे मनःपूर्वक आभार.

संपर्क : ९०११५६५७६५
शौनक रवींद्र जगताप.


Comments

Top