HOME   टॉप स्टोरी

सगळी कामं आमच्याच काळातली, मनपाला रुपयाही मिळाला नाही

गलथान कारभार, भ्रष्टाचार, नुसती आश्वासने, सरकार द्यायला तयार पण मनपाला घेता येत नाही!- दीपक सूळ


लातूर: महापौर म्हणून काम करण्यासाठी अल्पसा काळ मिळाला या काळातही आम्ही सव्वा दोनशे वर्क ऑर्डर काढल्या. आज लातूर शहरात जी काही कामे चालू आहेत ती सगळी आमच्या काळातली आहेत. अमृत योजनेच्या माध्यमातून मोठी कामे चालू आहेत. या कामांचीही वर्क ऑर्डर आमच्याच काळातली आहे. महापौर सक्षम असायला हवा हवा असं मत मनपातील विरोधी पक्षनेते, माजी महापौर दीपक सूळ यांनी व्यक्त केलं. ‘माझं लातूर माझं व्हिजन’ या आजलातुरच्या संवाद मालिकेत ते बोलत होते.
बराच काळ लोटला, लातूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आहे. पण सरकारकडून या मनपाला रुपयाही मिळू शकला नाही. आमच्याच काळातला सव्वा दहा कोटी रुपयांचा विकास निधी अजूनही पडून आहे. आमच्या निवडणुकीच्या माध्यमातून आ. अमित देशमुख यांनी जो शब्द दिला तो पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. शहराच्या चारही बाजुंना बागा, वॉकींग ट्रॅक असावेत, खेळाची मैदाने असावीत असा आमचा प्रयत्न आहे. शादीखान्याचा प्रश्न सत्ताधार्‍यांकडून सोडवून घेणार आहोत. इदगाह मैदानाची जागा कमी पडते. त्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. शहरात नवीन दफनभूमी आणि दहनभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देणार आहोत.
आज सत्ताधार्‍यांकडून गलथान कारभार होतो आहे, अनेक प्रकारचे भ्रष्टाचार सुरु आहेत ते उघड करण्याचे काम करीत आहे. लातूर मनपातील सत्ताधारी फक्त आश्वासने देतात, दिल्ली ते गल्ली असा बदल लातुरकरांनी केला, हा बदल करुन चूक झाली हे आता लातुरांच्या लक्षात आले आहे. आज घडीला महापौरांकडे अनेक प्रस्ताव-विषय धूळ खात पडून आहेत. निधीचेही प्रस्ताव प्रलंबित आहेत. महापौर सक्षम असायला हवा. वेगवेगळ्या कामांचे ठराव करुन सरकारकडे पाठवायला हवेत. सरकार द्यायला तयार आहे पण घेणार्‍याला घेता येत नाही. आम्ही दिलेली वचने पूर्ण करु, वाटल्यास त्यासाठी कॉंग्रेसच्या माध्यमातून मोठे आंदोलनही उभे करु असेही दीपक सूळ म्हणाले.


Comments

Top