लातूर: लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहूल केंद्रे आणि उपाध्यक्षपदी भारतबाई साळंकेंची बिनविरोध निवड झाली. विरोधकातून सोनाली थोरमोटे आणि धनंजय देशमुख यांनी अर्ज नेले होते पण त्यांनी ते दाखलच केले नाहीत. अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले.
भाजपाचे वर्चस्व कायम
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीत लातूर जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व कायम असल्याचे सोमवारी झालेल्या निवडीनंतर स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी भाजपाच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडीकडून भाजपाच्या ताब्यातील स्थानिक स्वराज्य संस्था हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असताना लातुरात मात्र आघाडीचे तीन सदस्य अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी गैरहजर राहिल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सोमवारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी ०२ वाजता निवडी झाल्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहुल केंद्रे तर उपाध्यक्ष म्हणून भारतबाई साळुंके यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसकडून सोनाली थोरमोटे व धनंजय देशमुख यांनी अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु आघाडीचे तीन सदस्य गैरहजर असल्याचे पाहत आणि शिवसेनेचा एक सदस्य भाजपासोबत असल्याचे पाहून त्यांनी माघार घेतली. आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात व युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसात भाजपाच्या सर्व सदस्यांना एकत्रित करण्यात आले होते. युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा एकसंध आहे आणि एकसंध हवा या दृष्टिकोनातून सर्व सदस्यांना एकत्रित केले. कुठलीही फाटाफूट होऊ नये याची काळजी घेतली. दरम्यानच्या काळात अनेक वावड्या, अफवा पसरवण्यात उठल्या. परंतु त्याचा कसलाही परिणाम सदस्यांवर झाला नाही. विशेष म्हणजे दोन अपक्षांसह महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या एका सदस्यानेही भाजपालाच पाठिंबा दिला. त्यामुळे मतदान झाले असते तरीदेखील अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर भाजपाचे उमेदवार विजयी झाले असते. निवडीच्या वेळी आघाडीचे तीन सदस्य गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ऐनवेळी तोंडावर पडण्याऐवजी माघार घेतलेली चांगली असा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात दिवसभर सुरू होती. अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल केंद्रे व भारतबाई साळुंके यांनी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यस निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मिनी मंत्रालयात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.
Comments