Latestnews

विमुक्त, भटके अन ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय

2016-12-27 21:58:26 5809 Views 0 Comments

मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विभागाचे नामकरण ‘विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग विभाग’ असे करण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून देण्यास मान्यता, दिग्रसच्या आठवले सूतगिरण्यांच्या मान्यतेसंदर्भात सुधारित धोरणासाठी वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन्याचे निर्देश, नर्सिंग अभ्यासक्रमासाठी नव्या पदांची नियुक्ती समितीद्वारे करण्यास मान्यता, प्रकल्पांना गायरान जमिनी देण्याबाबत शासनाच्या धोरणात सुधारणा, इमारतीच्या बांधकामास मुदतवाढीसाठी शासनाचे धोरण निश्चित; भाडेपट्ट्याने अथवा कब्जेहक्काने जमिनी, रमाई व शबरी घरकूल योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
नवीन विभाग निर्मितीसाठी तीन महिन्यांचा संक्रमण कालावधी राहणार असून ०१ एप्रिल २०१७ पासून नवीन विभाग कार्यरत होणार आहे. या नवीन प्रशासकीय विभागामध्ये विशिष्ट कार्यालये व महामंडळे वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे येथील विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग संचालनालय तसेच इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व त्यांची कार्यालये आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ व त्यांची कार्यालये यांचा समावेश आहे. या नवीन विभागासाठी स्वतंत्र सचिव आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची मिळून एकूण ५१ पदे नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत. या पदांसाठी अंदाजे वार्षिक ०२ कोटी २० लाख एवढा आवर्ती खर्च आणि ०१ कोटी ५० लाख इतका अनावर्ती खर्च अपेक्षित आहे. नवीन विभाग निर्मितीची रुपरेषा उच्चाधिकार समितीकडून ठरविण्यात येणार आहे. तसेच या विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करण्यासही आज मान्यता देण्यात आली.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी