Latestnews

२५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांसाठी १६ व २१ फेब्रुवारीला मतदान

2017-01-11 20:20:16 6219 Views 0 Comments

मुंबई : बृहन्मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होणार आहे. २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्यांत १६ फेब्रुवारी व २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होईल. पहिल्या टप्यात १५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या १६५ पंचायत समित्या आणि दुसऱ्या टप्प्यात ११ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्याची दोन्ही टप्प्यांत विभागणी केली आहे. सर्वांची मतमोजणी २३ फेब्रुवारी २०१७ रोजी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी येथील सचिवालय जिमखान्यात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आयोगाचे सचिव शेखर चन्ने हेदेखील यावेळी उपस्थित होते. श्री. सहारिया यांनी सांगितले की, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्व संबंधित जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक नसलेल्या क्षेत्रांत नियमित विकास कामांसाठी कोणतेही निर्बंध असणार नाहीत; परंतु निवडणूक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा करता येणार नाही.
पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारीला निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा: जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील 8 पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभाग. (या जिल्हा परिषदांतर्गतच्या एकूण १६५ पंचायत समित्या)
दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीला निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यातील ०४ पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभाग (या जिल्हा परिषदांतर्गतच्या एकूण ११८ पंचायत समित्या)

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी