मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाचा दोन्ही सभागृहात गुरुवारी मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले या ऐतिहासिक आनंदी क्षणाचे आपणाला साक्षीदार होता आले याचा मनस्वी आनंद आहे, असे सांगून या आरक्षण मागणीसाठी मराठा समाजाने राज्य, देश आणि जागतिक पातळीवर जो संघर्षपूर्ण लढा उभारला होता त्यांचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही खूप जुनी मागणी होती त्यासाठी वेळोवेळी मोर्चा आणि आंदोलने होत राहिली आहेत. अलीकडच्या काळात मराठा क्रांती मोर्चाने लक्षवेधी मोर्चे काढून आपली मागणी सातत्याने लावून धरली होती. समाजातील मुलींनी या शिस्तबद्ध अनोख्या मोर्चाचे नेतृत्व करून एक वेगळा संदेश समाजाला दिलेला आहे. शिस्तबद्ध विराट मूक मोर्चे, धरणे, चक्काजाम आंदोलने या माध्यमातून मराठा समाजातील मागासलेपण समोर आणून शासनाला आरक्षण देण्यासाठी भाग पाडले आहे. त्यामुळेच मराठा क्रांती मोर्चाला या ऐतिहासिक निर्णयाचे संपूर्ण श्रेय जाते आहे. या लढ्यात ज्यांनी आपले बलिदान दिले तेच मराठा आरक्षणाचे खरे हिरो असून आपण त्यांना या क्षणी सलाम करीत असल्याचेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
Comments