HOME   महत्वाच्या घडामोडी

मुंबईकरांच्या जीवाशी खेळू नका, अमित देशमुखांची लक्षवेधी

प्रदूषण करणारे उद्योग शहराबाहेर हलवण्याची वेळ आली आहे....


मुंबईकरांच्या जीवाशी खेळू नका, अमित देशमुखांची लक्षवेधी

मुंबई: रेल्वे रुळाच्या बाजूला गटाराच्या दूषित पाण्यावर पिकवल्या जाणाऱ्या भाज्या व उघड्यावर विकल्या जाणाऱ्या निकृष्ट खाद्यपदार्थामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर तात्काळ निर्बंध घालावेत अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत केली. अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी ही बाब चिंताजनक असल्याचे मान्य करताना रेल्वे मार्गाच्या बाजूचे पट्टे भाजीपाला पिकवण्यासाठी देऊ नयेत यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले. मुंबई शहरात उघड्यावर विक्री केले जाणारे लिंबू सरबत व उसाच्या रसासाठी वापरले जाणारे दूषित पाणी वापरले जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. लिंबू सरबताचे २८० पैकी २१८ व उसाच्या रसाचे ३०३ पैकी २६८ नमुने दूषित असल्याचे आढळून आले होते. या गंभीर बाबीसंदर्भात आमदार अमित देशमुख यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती. दूषित खाद्यपदार्थ व रेल्वे रुळाशेजारील जमिनीवर गटारातील दूषित पाण्यावर पिकवण्यात येणाऱ्या भाजीपाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत तातडीने कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी अमित देशमुख यांनी केली. मुंबईतील रेल्वे रुळाजवळील जमिनीचे भाडेपट्टे रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.
लक्षवेधी सुचनेवरील चर्चेच्या वेळी उपस्थित झालेल्या उपप्रश्नांना उत्तरे देताना अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी दूषित अन्नपदार्थ विकणाऱ्या आठ हजाराहून अधिक फेरीवाल्यांवर मुंबई महापालिकेने कारवाई केली असल्याची माहिती दिली. तसेच रेल्वे रुळांच्या बाजूला सांडपाण्यावर लावण्यात येणाऱ्या भाजीपाल्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने हे भाडेपट्टे रद्द करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वेमंत्रालयाला पत्र पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल झाली होती व न्यायालयानेही रेल्वेला याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार याचा पाठपुरावा करेल असे आश्वासन त्यांनी दिले. दूषित पाणी व खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायद्यात कठोर तरतुदी करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.


Comments

Top