पुणे: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑक्टोबरच्या १० ते १५ तारखेदरम्यान निवडणुकांची तारीख जाहीर होईल. त्यासाठी सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागु होईल अशी बातमी आहे. त्याला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही दुजोरा दिला आहे. या निवडणुकीत भाजपा-सेनेची युती आहे. जागावाटप आणि सत्तेतील भागीदारी यासाठी फिप्टी फिप्टीचा फॉर्म्युला लागू करावा असा सूर शिवसेनेतून ऐकायला येत आहे. तो खरा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मागच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीला पराभूत करण्यात आम्ही कमी पडलो पण आता तसे होणार नाही. बारामतीला पराभूत करायचेच आहे. त्यासाठी आपण सातत्याने बारामतीला भेटी देणार आहोत असेही पाटील यांनी सांगितले.
‘वंचित’कडे सर्वांचे लक्ष
दरम्यान या निवडणुकीची व्यूहरचना सगळ्याच पक्षांनी आधीच सुरु केली आहे. कॉंग्रेसने सहा जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागवले आहेत. भाजपने सदस्य नोंदणीवर भर दिला आहे. सहा जुलै ते १२ ऑगस्ट या काळात राज्यभर सदस्य नोंदणी चालणार आहे. त्यानंतरच उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु होईल. जवळपास सगळ्याच पक्षांनी आपल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आहे. वंचित बहुजन आघाडी काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments