HOME   महत्वाच्या घडामोडी

महाराष्ट्राच्या विकासासाठी डबल इंजिनचे सरकार द्या- अमित शाह

किल्लारीत अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ विराट सभा


महाराष्ट्राच्या विकासासाठी डबल इंजिनचे सरकार द्या- अमित शाह

औसा:आज महाराष्ट्राचा विकास गतीने होत आहे. विकासकामांची ही गती अशीच कायम ठेवायची असेल तर त्यासाठी डबल इंजिनचे सरकार गरजेचे आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आपण मोदी सरकार निवडून दिले, आता विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार निवडून द्या. आघाडी सरकारने पंधरा वर्षात राज्याचे जेवढे नुकसान केले ते या पाच वर्षांच्या कालावधीत भरून काढत महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू, अशी ग्वाही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी किल्लारी येथे विराट सभेत बोलताना दिली. औसा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ हुतात्मा स्मारकाशेजारील मैदानावर आयोजित सभेत अमित शहा बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, खा. सुधाकरराव शृंगारे, खा. ओमराजे निंबाळकर, आ. विनायकराव पाटील, सुरजितसिंह ठाकुर, आ. सुधाकर भालेराव उमेदवार अभिमन्यू पवार, माजी खासदार सुनिल गायकवाड, माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, माजी आमदार दिनकर माने, शिवसेनेचे पप्पू कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी, शोभाताई बेंजरगे, रासपचे दादा करपे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, लातूर मतदारसंघाचे उमेदवार शैलेश लाहोटी, रिपाईचे चंद्रकांत चिकटे, संताजी चालुक्य, संतोष मुक्ता आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, भाजपाच्या सरकारने विकासाला प्राधान्य दिले आहे. मागच्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारने गतीने विकासकामे केली आहेत. परंतु असे असतानाही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विकास झाला असे मानण्यास तयार नाहीत. वास्तवात आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळा पेक्षा अधिक विकासकामे मागच्या पाच वर्षात झाली आहेत. शरद पवार या पाच वर्षातील विकास कामांचा हिशोब मागत आहेत. हा हिशोब देण्यास आम्ही तयार आहोत. भाजपाने केलेल्या विकासकामांचा हिशोब भाजपाचा कोणताही सामान्य कार्यकर्ता देऊ शकतो. पूर्ण हिशोब द्यायचा झाला तर सात दिवसांचा भागवत सप्ताह देखील पुरणार नाही. आम्ही विकास केला आहे. परंतु आघाडी सरकारने केवळ आणि केवळ भ्रष्टाचारच केल्याचेही शहा म्हणाले. मागील पाच वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर एकही आरोप झाला नाही. भाजपाला देश भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र सिंचन योजनांसाठी ७० हजार कोटी रुपये खर्च करून त्यात भ्रष्टाचार केला. याउलट फडणवीस सरकारने अत्यंत कमी पैशात १७००० गावात जलयुक्त शिवारची कामे केली. लातूर जिल्ह्यासाठीही सरकारने भरभरून दिले आहे. रेल्वे बोगी प्रकल्प, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यासारखे प्रकल्प दिले आहेत. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प राबविण्यात येत आहे असाही दावा अमित शाह यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विचार ऐकण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी किल्लारी येथे हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. शहा यांनी जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देऊन भाषणाला सुरुवात केली. यामुळे उपस्थित जनसमुदायात उत्साह संचारला. शहा यांनी भाषणाच्या प्रारंभी सिद्धेश्वर रत्नेश्वर, किल्लारीचे ग्रामदैवत निळकंठेश्वर तसेच महात्मा बसवेश्वर, डॉ, शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा केलेला उल्लेख जनसमुदायाच्या मनाला स्पर्श करून गेला. सभेच्या काही क्षणापूर्वी किल्लारी व परिसरात पाऊस झाला. परंतु नेमक्या वेळी पाऊस थांबल्याने उपस्थितांना शहा यांचे भाषण ऐकता आले. या सभेला उपमहापौर देविदास काळे, प्रवीण कस्तुरे, सुभाष जाधव, काकासाहेब मोरे, प्रकाश पाटील, भाऊराव देशमुख यांच्यासह औसा मतदारसंघासह जिल्ह्याच्या सर्व भागातून आणि शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Comments

Top