लातूर: विलासराव देशमुख यांनी कष्टातून लातूर जिल्हा घडविला. लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न अखेरपर्यंत केले आणि हाच वारसा आता पुढे आमदार अमित देशमुख नेत आहेत. त्यांच्या नेतृत्वात यापुढे लातूरच्या विकास रथाला आणखी वेग मिळावा यासाठी लातूरच्या मतदारांनी आमदार अमित देशमुख यांच्या पाठीशी आपले आशीर्वाद उभे करावेत, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. काँग्रेस महाआघाडी उमेदवार प्रचारार्थ लातूर मार्केट यार्ड याठिकाणी आयोजित कामगार मेळावा व प्रचार सभेस ते संबोधित करीत होते.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस महाआघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदार संघातील उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सेल हॉल या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विमुक्त भटके, वडार, बंजारा, ओबीसी कामगारांचा मेळावा पार पडला.
अमित यांच्या भाषणामुळे विलासरावांची आठवण येते
आमदार अमित देशमुख यांचे भाषण ऐकले, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची असलेली तळमळ पाहिली की माझ्या मित्राची आठवण आल्याशिवाय राहत नाही असे म्हणत आदरणीय विलासराव देशमुख यांच्या सोबत काम करतानाच्या आठवणींना शिंदे यांनी उजाळा दिला. ज्या विलासराव देशमुख यांनी अतिशय कष्टातून हा लातूर जिल्हा घडविला त्या मित्राने दाखवून दिलेला विकासाचा मार्ग अविरतपणे पुढे सुरू ठेवण्याचा वारसा आमदार अमित देशमुख चालवीत आहेत पुढेही कायमपणे चालवीत राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखाद्या धरणातील पाणी साठ्याचा वापर शेजारील जिल्ह्याला व्हावा असा दृष्टीकोन तत्कालीन काँग्रेस महाआघाडी सरकारचा होता. त्यात लातूरला ही उजनीचे पाणी मिळावे यासाठी विलासराव देशमुख यांनी प्रयत्न केले होते आणि आता आमदार अमित देशमुख यांनी उजनीच्या पाणी लातूरला आणण्याचा निर्धार केलाय हा निर्धार पूर्णत्वास जावा यासाठी त्यांना प्रचंड मताधिकयाने विजयी करा असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
Comments