लातूर: राज्याचे सलग दोनवेळा नेतृत्व करणाऱ्या विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळातही लातूर विकासापासून दूरच राहिले. मागच्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात विकास कामांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी तसेच लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी सुजाण मतदारांनी या निवडणुकीत शैलेश लाहोटी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विधानसभेत पाठवावे, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केले.
भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीचे लातूर शहर विधानसभेचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारार्थ लातूरच्या हनुमान चौकात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार बसवंतप्पा खुब्बा, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, उमेदवार शैलेश लाहोटी, महापौर सुरेश पवार, स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती, गटनेते शैलेश गोजमगुंडे, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनात येडियुरप्पा यांनी महाराष्ट्राच्या महात्मा फुले, शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या पावन भूमीत आल्यास आपणास खूप आनंद होतो. महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांमधील संबंध मागच्या अनेक वर्षांपासून अत्यंत जवळचे राहिले आहेत असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील विकास कामात अमुलाग्र बदल झाला आहे. विकासाला गती प्राप्त झाली आहे. मागच्या अनेक वर्षात या जिल्ह्यातील पाणी व इतर नागरी समस्या पूर्णतः सुटू शकल्या नाहीत, ही बाब आश्चर्यजनक आहे. साधा पाण्याचा प्रश्नही एवढ्या वर्षात सोडवू न शकणाऱ्या काँग्रेस नेत्यांना आता त्यांची जागा दाखवून देण्याची योग्य वेळ आली आहे. विकासाची दूरदृष्टी लाभलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्याबरोबरच लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी शैलेश लाहोटी यांना विजयी करण्याचे आवाहनही येडियुरप्पा यांनी केले.
Comments