‘सकाळपासून रात्रीपर्यंत, तेच ते अन तेच ते’ या विंदा करंदीकर यांच्या कवितेप्रमाणेच आपलंही जीवन असचं एकसुरी झाले आहे. काही नवीन करायला आपण जात नाही. नविनतेचा शोध घेण्याऐवजी आपण आहे त्या गोष्टीत जास्त रममाण होतो. नवनिर्मितीच्या आनंदापेक्षा आपल्याला पुनरुक्तीचा आनंद अधिक आवडतो. नवीन आव्हाने स्विकारुन काही तरी करण्याबाबत आपण फ़ारच उदासीन आहोत. यासाठी जुन्या गोष्टींबरोबरच नवीन गोष्टी शिकण्याची आपली तयारी असली पाहिजे. अशा प्रकारचा काहीसा विचार लातुरातील एका कार्यशाळेत केला गेला.
‘नवीनतेचा शोध घेण्याची आपली तयारी आहे का? हे तपासून पाहताना अधूनमधून आपल्या सामर्थ्याचा शोध आपण घेतला पाहिजे, आधीचे शिकलेले बाजुला काढून टाकले तर नवीन विचार रुजतील’ असे मत माधुरीताई पुरंदरे यांनी या कार्यशाळेत व्यक्त केले. हा नवीनतेचा शोध घेण्यासाठी प्रत्येकालाच कलेचा आधार घेण्याची गरज आहे. कला आपले जगणे समृध्द करते. ज्या भावना, विचार आपण शब्दात मांडू शकत नाही ते कलेतून मांडणे सहज शक्य होते. शिवाय ते जास्त परिणामकारक असते. कलेचे आपल्या जीवनातले महत्व लक्षात घेऊन पुण्याच्या थिएटर अकॅडमीने सकल कलाघर नावाची संस्था स्थापन केली. ही संस्था पुण्यात विद्यार्थ्यांसाठी कलाकारी कार्यशाळा घेते. दर शनिवार- रविवार विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होतात. चित्रकला, नृत्य, संगीत या तीन प्रमुख विषयांवर मुलांना मार्गदर्शन, चित्रफ़ित आणि प्रात्यक्षिके यातून माहिती दिली जाते. लातुरात श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या पुढाकारातून नुकतीच अशी एक कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी दोन स्वतंत्र कार्यशाळा झाल्या. या कार्यशाळेत प्रसिध्द लेखिका माधुरीताई पुरंदरे, पुरातत्व शास्र तज्ज्ञ अनघा भट आणि नृत्य मार्गदर्शक श्रीनिवास काटवे यांनी मार्गदर्शन केले.
‘कलाक्षेत्रात जे काही करायचे ते कलाकारांनीच करावे असे म्हणत आपण कलांना नकार देतो. ही सर्वसामान्यपणे आपली भूमिका असते. मी शिकवत असलेल्या विषयात कलेचा काय संबंध असे आपण मानतो. पण प्रत्येकांनीच कलेशी नाते जोडले पाहिजे. मुलांना वाढविताना, शिकविताना त्यांच्यात विविध कलांचा अस्वाद घेण्याच्या जाणिवा झिरपायला हव्यात. मुलांना कशात नि कसा आनंद मिळतो हे समजून घ्यायला हवे. कलेकडे पाहण्यासाठी नजर, कान तयार व्हावा लागतो. जे काही करायचे ते स्वत:साठी करा. मला जर चांगले समजले तर मी इतरांना देऊ शकते. यासाठी प्रत्येकानेच कलेशी नाते जोडायला हवे’. असे माधुरीताईंनी शिक्षकांना सांगितले.
शिक्षकांनी चित्रकलेतील रेषातत्व समजून घेतले. आजुबाजुला रेषा कुठे कुठे दिसतात याचा शोध घेत शिक्षकांनी रेषेचाही एक स्वभाव असतो हे अभ्यासले. कागदावर विविध रेषा काढत प्रत्येकीचा स्वभाव जाणून घेतला. रेषा सरळ, ताठ, लाजाळू, रागीट, लडिवाळ, प्रेमळ, प्रवाही, लवचिक, आक्रमक, लयबध्द, कणखर अशी विविध रुपे घेऊन आपल्या समोर येतात याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी आवाजाची दुनिया जाणून घेतली. डोळे बंद करुन आजुबाजुचे आवाज शोधले. शरीराचा उपयोग करुन कसे आवाज निघतात ते पाहिले. भाषा जेव्हा अस्तित्वात नव्हती तेव्हा आवाज आणि शिट्यांच्या मदतीने संदेश कसा दिला जायचा याची चित्रफ़ित मुलांनी पाहिली.
‘इतिहास म्हणले की राजे, महाराजे, युध्द, सनावळ्या अशाच गोष्टी, असा आपला समज आहे.तर इतिहास आपल्या जगण्याचाच एक भाग आहे. आपल्या कुटुंबाचाही एक इतिहास असतो. तोही आपण समजून घेतला पाहिजे’, असे अनघा भट यांनी मुलांना सांगितले. मग मुलांनी आपल्या बालपणातील विविध आठवणी जागवल्या. त्यातलीच एक आठवण कागदावर चित्रबध्द केली. तीआठवण मातीच्या मदतीने मूर्तीबध्द केली.
इतिहासासाठी निरीक्षण महत्वाचे. तेव्हा निरीक्षण करुन मुलांनी आणि शिक्षकांनी आपल्या सहकार्याचे रेखाचित्र रेखाटले. इतिहासाचा अंतर्भाव कोठे कोठे होतो याचा शिक्षकांनी विचार केला. आपल्या दैनंदिन जीवनात घडून गेलेली घटना कालांतराने इतिहास बनते. याचाही विचार व्हायला हवा याची जाणिव शिक्षकांना करुन देण्यात आली. यासाठी ‘नोटाबंदी’ हा इतिहास होऊ शकतो. याचे काय काय़ परिणाम जाणवले याची शिक्षकांनी चर्चा केली. त्याचे आर्थिक, सामाजिक परिणाम पाहिले.
एखादी कृती करताना आपण आपल्या ‘कम्फ़र्ट झोन’ मधून बाहेर पडून आव्हाने स्विकारतो का? हे पाहण्यासाठी शिक्षकांनी डोळे बांधून संगीताच्या तालावर कोळशाच्या पुडवर आपले हात चालवून पाहिले. एखादी कृती करताना आपण आधीच मर्यादेची चौकट आखून घेतो का हे तपासून पाहिले. पूर्वापार चालत विचारांचे आपल्यावर बंधन असते. वेगळे काही तरी करताना इतरांच्या प्रतिक्रियांचा विचार अधिक केला जातो’ असे शिक्षकांनी सांगितले. मुलांनीही अशा प्रकारची कृती करुन आपण काय काय करु शकतो त्याचा अनुभव घेतला. अनघाताईंनी पुरातत्व म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा शोध कसा घ्यायचा याची माहिती दिली. या शोधात कोणकोणत्या विषयांचा अभ्यास होतो हे सांगितले. म्हणजे एखाद्या स्थळाचा शोध लागल्यावर तो फ़क्त इतिहास नसतो. तर त्यात भूगोल, गणित, विज्ञान, भाषा, समाज शास्र, संस्कृती, कला अशा विविध गोष्टी अभ्यासल्या जातात. तेव्हा हा केवळ इतिहासापुरता मर्यादित रहात नाही.
उत्खनन म्हणजे काय याचा मुलांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. प्रत्यक्ष उत्खनन करुन त्यात सापडलेल्या वस्तू, तिथला भौगोलिक परिसर, लोकजीवन यांचा अभ्यास केला. चित्रकलेचा उगम जाणून घेताना गुहेत जाऊन मुलांनी चित्रे चितारली. गोष्टींचा अस्वाद घेत त्यातील पात्रांची वेशभूषा तयार केली.मॉडेल विविध कपडे चढवून रॅंपवर उतरले.
भारतीय नृत्य परंपरा जाणून घेत भरत नाट्यमचा पदन्यास केला. विविध तालवाद्यांचा अनुभव घेतला. आपल्या आजुबाजुच्या वस्तुंमधून कसा ताल निर्माण होतो त्याची चित्रफ़ित पाहिली.
तीन दिवस अशा विविध दृश्यकलांची ओळख कार्यशाळेत झाली. "आपल्या संवेदना जागृत ठेवण्यासाठी मी काय करायला हवे हे प्रत्येकानेच ठरवले पाहिजे. रोजच्या व्यवहारात आपल्याला अनेक गोष्टी स्वत: करता येतात. बर्याचदा काही गोष्टी नाकाराव्या लागतात. त्याबाबत आपण ठाम असले पाहिजे. योग्य वाटते सतत करत रहा. तसेच मुलांना वाढविताना, शिकविताना मुलांना नेमके काय हवे आहे आणि आपण काय़ देऊ शकतो याचा विचार करा. तुमची स्वत:ची वाढ कोणत्या गोष्टींनी व्हायला हवी याचा विचार करा. आपणच जर हरवलेले असू तर समोरच्याला समजू शकणार नाही. कान, डोळे आपल्या पध्दतीने तयार व्हायला हवेत.शिक्षकाची भूमिका केवळ पोस्टमनची नसावी. पुस्तकात आहे तेवढेच मुलांपर्यंत पोहचवायचे. त्या पलीकडे जाऊन मी मुलांमध्ये कलाविषयक जाणिवा कशा रुजवू शकते याचा विचार जरुर करा." असे समारोपात माधुरीताईंनी सांगितले.
अनघाताई म्हणाल्या, " मोकळं होण्याची सार्यांनाच गरज असते. हसत खेळत मुलांना शिकवा. पण त्यातही एक शिस्त हवीच. सुरुवात शिस्तीतून जरी झाली नाही तरी शेवट शिस्तीतच व्हायला हवा. प्रत्येकानेच वेगळेपण जपण्याची गरज आहे".
तीन दिवस चाललेल्या कार्यशाळेत या सार्यांचा विचार मोकळेपणाने झाला. शिक्षकांनी आपले बालपण पुन्हा अनुभवले. विद्यार्थ्यांनी पुस्तकाच्या बाहेर पडून काही अवघड विषयांच्या प्रात्यक्षिकांचा आनंद घेतला. वेगळा उत्साह, विचार, अनुभूती, जाणीवा, उर्जा घेऊन सारेजण कार्यशाळेतून बाहेर पडले. कलेकडे डोळसपणे पाहण्याचा विचार शिक्षकांनी मनात रुजविला.
- भारती गोवंडे, लातूर (९२८४७९५४९२)
Comments