HOME   महत्वाच्या घडामोडी

सरकार स्थापन करता येत नाही? घरी जा!

राज्याला वेठीला धरु नका, तमाशे बंद करा, सर्वसामान्यात नाराजी..


सरकार स्थापन करता येत नाही? घरी जा!

रवींद्र जगताप, विशेष संपादकीय: निवडणुकीचा निकाल लागून बारा दिवस झाले. राज्याची बारा वाजायची वेळ आली, अजून सरकार स्थापन होत नाही. मोठा भाऊ, छोटा भाऊ राज्याच्या प्रॉपर्टीसाठी राजकारण खेळत आहेत. वाघ आणि सिंह समोर भांडत नाहीत. गुपचूप डरकाळ्या फोडत आहेत. महाराष्ट्राची शेळी-मेंढी करुन टाकलीय. लोकांना ही नाटकं कळत नाहीत का? यावेळी सगळ्याच पक्षाचे आमदार कमी झाले एवढा धडा पुरे नाही का? उद्या यापेक्षा वाईट अवस्था येऊ शकते, बोध घेता येत नाही का? एकाला पक्ष टिकवायचाय, दुसर्‍याला पक्ष वाढवायचाय. कुणाला लंगोटी सांभाळायचीय तर कुणाला कमरेच्या नेसुची काळजी आहे. यात ज्यांच्या जिवावर राज्य करायचंय त्यांचा विचार कुठे आहे? राज्यानं अनेक वर्षे दुष्काळ पाहिले. ज्या शेतकर्‍यांच्या जिवावर जगताय तो पार मेटाकुटीला आलाय. उद्योगधंदे बंद पडताहेत. मंदीची लाट आहे. लोकांकडे पैसा नाही. रोजगार नाही, बाजार ठप्प आहे. तरीही तुमची सत्तेची नाटकं चालू आहेत. केंद्रातल्या बड्या नेत्यांची भिती दाखवणं चालू आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यापासून राज्यातल्या जनतेला एकही सुखाचा क्षण बघायला मिळाला नाही!.....या प्रतिक्रिया आहेत जनतेच्या. त्यांना उत्तर मिळेल का हा खरा प्रश्न आहे.
नऊ तारखेला विधानसभेचा कालावधी संपतो. तोवर सरकार स्थापनेचा प्रयत्न न झाल्यास राज्यपालांच्या हातात सत्ता जाते. ते प्रमुख पक्षांना बोलावतात. त्यांची ताकद जोखतात. ताकदबाज नाही मिळाल्यास राष्ट्रपतींकडे अहवाल देतात. मग राज्यावर राष्ट्रपती राजवट येऊ शकते. याला कोण जबाबदार? असाही प्रश्न विचारला जातोय. ९९ टक्के राजकारण आणि ०१ टक्का समाजकारण असा सध्याचा खेळ चालू आहे. खेळ कुणाला दैवाचा कळला असं दैववादी माणसं म्हणत आहेत.


Comments

Top