औरंगाबाद: ‘महापरीक्षा पोर्टल’मध्ये अनेक गैरप्रकार होत असून प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या परीक्षार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे हे महापरीक्षा पोर्टल तात्काळ बंद करावे अशी मागणी लक्षवेधीद्वारे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी विधानपरिषदेत केली. या प्रश्नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांवर यापुढे परीक्षा देताना सरकारकडून कुठलाही अन्याय होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.
राज्य सरकारच्या विविध पदभरतीच्या परीक्षा ‘महापरीक्षा पोर्टल’व्दारे घेण्यात येतात. मात्र या ‘महापरीक्षा पोर्टल’मध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याचे समोर आले असून प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या परीक्षार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच एखादा परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर असला तरी त्याचे नाव अंतिम गुणवत्ता यादीत येणे, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात देणे, अनेक परीक्षांमध्ये चुकीचे प्रश्न विचारून चुकलेल्या प्रश्नांचे सरसकट गुण बहाल करणे असे अनेक गैरप्रकार समोर आले असल्याचे देखील आ. सतीश चव्हाण यांनी सभागृहात सांगितले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांमध्ये ‘महापरीक्षा पोर्टल’ विरोधात प्रचंड असंतोष पाहण्यास मिळत आहे. या विद्यार्थ्यांनी विविध जिल्ह्यांत हजारोंच्या संख्येने मोर्चे, आंदोलने करून हे ‘महापरीक्षा पोर्टल’ तात्काळ बंद करा अशी मागणी केली आहे. मात्र त्याची शासनाकडून काहीच दखल घेण्यात आली नसल्याचे देखील आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.
आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापोर्टल संदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या असल्याचे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांच्या भावनांशी मी सहमत असून यापुढे परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल असे एकही काम सरकारकडून होणार नसल्याचे सांगितले. तसेच महापरीक्षा पोर्टल संदर्भात लवकरच बैठक घेवून यात आवश्यक ते बदल करण्यात येतील असेही सांगितले.
Comments