HOME   महत्वाच्या घडामोडी

प्रत्येक जिल्हयात कला अकादमी

संस्कृतिच्या जतनासाठी प्रयत्न- ना. अमित देशमुख


प्रत्येक जिल्हयात कला अकादमी

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयाचे वैशिष्टय आहे, वेगवेगळया संस्कृती आहे. या संस्कृती जपल्या जाव्यात तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात यासाठी प्रत्येक जिल्हयात कला अकादमी स्थापन करण्यावर भर देण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध संचालनालयाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह संबंधित संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.
गड किल्ल्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहोचेल यावर भर द्या.
राज्यातील अनेक वैभवशाली ऐतिहासिक गड- किल्ल्यांची पडझड होत असल्याने या गड - किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण यावर भर देणे आवश्यक आहे. गड किल्ल्यांची महती सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचेल यावर भर देण्यात यावा. राज्यातील औसा, राजगड, नवदुर्ग, परांडा या ऐतिहासिक किल्ल्यांचे मूळ स्वरुपात जतन करताना या किल्ल्यांची डागडुजी करण्यात आली असून याच पध्दतीने राज्यातील गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व कमी न करता वास्तूंचे जतन व संरक्षण करण्याला प्राधान्य देण्यात यावे.
'मुंबई बिनाले' महोत्सव सुरु करणार.
महाराष्ट्रात नाटक, सिनेमा, संगीत, मालिका याचा गौरवशाली इतिहास आहे. कला, संस्कृती आणि संगीत यांचा मेळ घालून कोची मुझिरीस बिनालेच्या धर्तीवर मुंबईत मुंबई बिनाले महोत्सव सुरु करण्याचा विचार करता येईल असे ना. अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी सांगितले. आज मराठीबरोबर दतर भाषिक लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात येतो अशा लेखकांनाही पुरस्कार देण्यासाठी सांस्कृतिक विभाग पुढाकार घेईल.
प्राचीन संस्कृती असलेल्या कातळशिल्पांचे संवर्धन करणार.
राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन,प्राचीन कलांचे जतन, आणि संरक्षण याला प्राधान्य देण्यात येणार आहे. युनेस्कोने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा असलेल्या कातळशिल्पांचे संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून प्राधान्य देण्यात येईल.रत्नागिरी जिल्हयात प्राचीन संस्कृतीच्या खुणा असलेली कातळशिल्पे आढळून आली आहेत. कातळशिल्पांचे योग्य पध्दतीने संवर्धन झाल्यास देश-विदेशातील पर्यटक महाराष्ट्रात येऊ शकतील आणि त्यासाठीच राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या मदतीने प्राचीन कातळशिल्पांच्या संवर्धन आणि संरक्षण याला प्राधान्य देण्यात येईल. कातळशिल्पे पाहण्यासाठी पर्यटकांच्या संख्येमुळे संरक्षित करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असून त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेण्यात येईल.
पुरस्कार दरवर्षी देण्यात यावेत.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या संचालनालयामार्फत देण्यात येणारे पुरस्कार, महोत्सव, स्पर्धा आणि शिबिरे यांचे वार्षिक वेळापत्रक पाळले जाईल यावर भर देण्यात यावा, तसेच महत्वाचे वार्षिक पुरस्कार त्याच वर्षी देण्यात येईल याचे नियोजन करण्यात यावे अशा सूचना ना. अमित विलासराव देशमुख यांनी विभागाला दिल्या.
दरम्यान सांस्कृतिक मंत्री यांनी यावेळी सांस्कृतिक संचालनालय, पु.ल.देशपांडे कला अकादमी, पुराभिलेख संचालनालय, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती साहित्य अकादमी, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ आणि गोरेगाव चित्रनगरीचा सविस्तर आढावा यावेळी घेतला


Comments

Top