वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा महत्वाकांक्षी नवीन कर संपूर्ण देशात लागू झाला आहे. या कराबाबत विनाकारण गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. व्यापाऱ्यांनी आपला व्यापार कायदेशीर करावा, त्यातून हा जीएसटी फायद्याचाच आहे हे स्पष्ट होईल. या नवीन करामुळे व्यापाऱ्यांना कुठलीही अडचण येण्याचे कारण नाही असे मत पुण्याचे जीएसटी अपर आयुक्त ओमनारायण भांगडीया यांनी व्यक्त केले. येथील लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या कृष्णकुमार लाहोटी सभागृहात राजकन्या दामोदर मालू यांनी दिलेल्या वैद्यकीय उपकरणांचा (मेडीकल इक्विपमेंट) लोकार्पण सोहळा पार पडला. याला जोडूनच पुण्याचे जीएसटी भांगडीया यांचे जीएसटीवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, राजकन्या मालू, सुरेश मालू, श्रीनिवास लाहोटी, लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड, प्रकल्प चेअरमन तथा कोषाध्यक्ष फुलचंद काबरा, सचिव सत्यनारायण हेड्डा, अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे सदस्य अशोक सोनी, बालकिशन बांगड, माहेश्वरी सेवा निधीचे अध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, गोकूळ चांडक आदिंची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र सरकारने आणलेल्या या जीएसटीमुळे राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाली आहे. यामुळे व्यापारही वाढणार आहे. व्यापारी आता कोठूनही माल खरेदी करू शकतात. हा माल खरेदी करताना संबंधितांनी जीएसटी भरणा केला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागेल, असे नमूद करून भांगडीया यांनी व्यापाऱ्यांनी काळजीपूर्वक व कायदेशीर व्यापार करावा. या पद्धतीने व्यापार केल्यास कोणतीही अडचण भासणार नाही. आपल्या प्रतिष्ठानच्या वा दुकानच्या फलकावर आपला जीएसटी क्रमांक टाकावा असे सांगितले. प्रास्ताविक माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पल्लोड यांनी करून सभेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विधायक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी भन्साळी, सोनी, लाहोटी, राजकन्या मालू आदिंनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी वैद्यकीय उपकरणे देणाऱ्या राजकन्या मालू यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार मंत्री यांनी केले व सत्यनारायण हेड्डा यांनी आभार मानले.
Comments