HOME   लातूर न्यूज

पाणी पुरवठा योजनेसाठी ०३ कोटी ९४ लाख रुपये मंजूर

शिराळा, चिंचोली, भिसेवाघोली, येळी, ढोकी गावांचा पाणी प्रश्न मार्गी; रमेशअप्पा कराड यांचा पाठपुरावा


पाणी पुरवठा योजनेसाठी ०३ कोटी ९४ लाख रुपये मंजूर

लातूर: गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेल्या शिराळा पाच खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून ०३ कोटी ९४ लाख ८६ हजार रुपये एवढा निधी मंजूर केला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाने या योजनेस नुकतीच तांत्रीक मान्यता प्रदान केली आहे. या योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे लातूर ग्रामीणचे भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून शिराळा, चिंचोली(ब.), भिसेवाघोली, येळी व ढोकी या पाच गावांचा अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला पाणी पुरवठा योजनेचा पश्न मार्गी लागला असल्याची माहिती निवळी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रिती सूरज शिंदे व भाजपाचे लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.
लातूर तालुक्यातील रायगव्हाण प्रकल्पावरील शिराळा पाच खेडी पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन व जलशुध्दीकरण केंद्र मोडकळीस आल्याने त्याचबरोबर विद्युत देयक थकल्याने ही योजना सन २०१० पासून बंद पडलेली आहे. या योजनेव्दारे पाणी पुरवठा होत असलेल्या शिराळा, चिंचोली(ब.), भिसेवाघोली, येळी, ढोकी या पाच गावात पिण्याच्या पाण्याचे इतर सार्वजनिक स्रोत नसल्याने येथील नागरिकांना गंभीर पाणी टंचाईस सामोरे जावे लागत होते. राज्यात भाजपा सत्तेत आल्यापासून शिराळा पाच खेडी पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या सहकार्याने व लातूर ग्रामीणचे भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे वेळो-वेळी पाठपुरावा केला जात होता.


Comments

Top