HOME   लातूर न्यूज

विलास साखर कारखाना येथे वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

सुरक्षित वाहन चालवून आपला जीव सांभाळा, दुर्घटना व अपघात टाळा- आवाहन


विलास साखर कारखाना येथे वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

लातूर: दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच असून अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने रस्ता सुरक्षा नियमांचे पालन तंतोतंत करणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित वाहन चालवून आपला जीव सांभाळावा, दुर्घटना व अपघात टाळावेत असे आवाहन यावेळी महामार्ग पोलीस लातूरचे सहायक पोलीस निरीक्षक जयंत गाडेकर यांनी केले. विलास सहकारी साखर कारखाना व महामार्ग पोलीस, लातूर यांच्या वतीने रस्ता सुरक्षा मोहिम अंतर्गत विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळी येथे सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. प्रारंभी कारखान्याच्या वतीने वाहनास लावण्यात येणाऱ्या रिफलेक्टर लावण्याचे महामार्ग पोलीस यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच त्यांचे महत्व सांगितले. यावेळी महामार्ग पोलीस निरीक्षक जयंत गादेकर, व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, संचालक युवराज जाधव, रवि काळे, भारत आदमाने, जयचंद भिसे, चंद्रकांत टेकाळे, माजी संचालक प्रताप पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक एस.व्ही.बारबोले, सचिव संजय सोनवणे, कार्यालय अधिक्षक एन. बी. देशपांडे, शेतकी अधिकारी एस. एस. कल्याणकर, ऊस विकास अधिकारी डी. एस. कदम, खातेप्रमुख, विभागप्रमुख आदी उपस्थित होते. विलास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार अमित देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे रस्ता सुरक्षा मोहिम अंतर्गत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा मोहिमेतर्गत वाहन मालक व वाहन चालक यांना सुरक्षित वाहतूक संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महामार्ग पोलीस निरीक्षक जयंत गादेकर व त्यांचे सहकाऱ्यांनी वाहन मालक व वाहन चालक यांना वाहनाचा वेग, वाहनाची स्थिती, वाहन चालविणे या बाबतचे नियम सांगितले. तसेच कारखान्याच्या वतीने देण्यात येणारे रिफलेक्टर बसवून सुरक्षित वाहतूक करण्याचे आवाहन केले.


Comments

Top