लातूर: मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणारे चाळिसावे मराठवाडा साहित्य संमेलन दि २३ ,२४ व २५ डिसेंबर रोजी उदगीर येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. साहित्य संमेलन हा जगन्नाथाचा रथ समजून तो ओढण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देऊन हे संमेलन महाराष्ट्रात आदर्श ठरेल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष, मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी केले.
उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पूर्व तयारीसाठी मसापची लातूर शाखा तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत उप शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मसापच्या लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. जयद्रथ जाधव, संमेलनाचे प्रमुख कार्यवाह सुधाकर वायचळकर, संयोजन समिती सदस्या अनिता येलमटे, स्वागत समिती सदस्य ॲड. पद्माकर उगीले, कवी नरसिंग इंगळे, प्रकाश घादगिने, नयन राजमाने, शैलजा कारंडे, गट शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांची उपस्थिती होती .
नरसिंग इंगळे यांनी साहित्य संमेलने ही काळाची गरज असल्याचे सांगून ग्रामीण भागातील माणसं, संस्कृतीचे प्रतीक म्हणजेच साहित्य होय. म्हणूनच शिक्षकांसोबत शेतकऱ्यानीही या संमेलनास उपस्थित राहावे असे ते म्हणाले. लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. जयद्रथ जाधव म्हणाले की साहित्य संमेलन आपल्या भागात होणे ही मेजवानीच आहे. मोबाईलमध्ये गुंतलेल्या युवा पिढीला साहित्याकडे वळविण्याचे काम करावे लागणार आहे. मराठी, कानडी आणि तेलगू भाषिक राज्यांच्या सीमेवर असलेल्या उदगीर शहरात हे संमेलन होत आहे. या तीनही भाषाना संमेलनात व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. साहित्यासोबतच कृषी क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांचाही संमेलनात गौरव व्हावा अशी सूचना त्यांनी केली. या बैठकीचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मसापच्या लातूर कार्यकारिणीचे सदस्य विवेक सौताडेकर यांनी केले.
Comments