लातूर: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि इतर ठिकाणी निवडणुका लढल्या. या निवडणूकांचा निकाल जाहीर झाला आहे. जनतेने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील भाजपाची सत्तेच्या विरोधात कौल दिल्याचे दिसून येत आहे. खोटी आश्वासने देवून फसवणूक करणार्या भाजपाला जनतेने धडा शिकवला आहे. भाजपा सरकारने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक यांच्याकडे दुर्लक्ष करून सर्व सामान्यांचे जगणे कठीण केले. भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला. भाजपा सरकारचे राजकीय निर्णय आणि धोरण जनसामान्यांना दिलासा देणारे न ठरता त्यांचे जीवन उध्वस्त करणारेच ठरले. याचा राग जनतेमध्ये होता तो या निवडणुकांच्या निकालातून समोर आला आहे. खासदार राहूल गांधी यांनी एक वर्षापूर्वी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धुरा हाती घेतली आणि काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले हे यश राहूल गांधी यांच्या नेतृत्वाचेच आहे. राजस्थानमध्ये सचिन पायलट, अशोक गेहलोत, मध्यप्रदेशमध्ये ज्योतीरादित्य सिंधीया यांनी काँग्रेसचा विचार घराघरापर्यंत पोचवून जी मेहनत घेतली त्याचे दृष्यस्वरूप काँग्रेसच्या यशातून दिसून येत आहे. या तिन्ही राज्यात काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले आहे. काँग्रेस पक्षाचे हे यश देशाच्या राजकारणाची पुढील दिशा आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील जनतेचा कल याविषयी संकेत देणारे आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपा सरकारांनी जे केले तेच महाराष्ट्रातील भाजपा सरकारकडूनही केले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही फडणवीस सरकारच्या विरोधात जनमत तयार होत आहे. आगामी काळात लोकसभा निवडणुकीत परिवर्तनाची लाट भाजपाचा पराभव करून काँग्रेसला बहुमत मिळवून देईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
Comments