HOME   लातूर न्यूज

वंशवाद-जातीवाद एकच महणून गांधीजींनी अस्पृश्योध्दाराला महत्व दिले

गांधी आणि आंबेडकर यांच्यात विनाकारण शत्रूत्व असल्याचे सांगितले जाते -डॉ.जनार्धन वाघमारे


वंशवाद-जातीवाद एकच महणून गांधीजींनी अस्पृश्योध्दाराला महत्व दिले

लातूर: वंशवाद आणि जातीयवाद हा एकच असल्याची जाणीव महात्मा गांधीजींना झाली व त्यानंतरच गांधीजींनी भारतात अस्पृश्योध्दाराला महत्व दिले असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत डॉ. जनार्धन वाघमारे यांनी केले. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, लातूर यांच्या वतीने आंबेडकर पार्कवर आयोजित ग्रंथोत्सव २०१८ च्या, महात्मा गांधी यांच्या विचारांचे विविध पैलू या विषयावरील पाचव्या सत्रातील परिसंवादाच्या अध्यक्षपदावरुन डॉ.जनार्दन वाघमारे बोलत होते. मंचावर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे, विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे व बसवेश्‍वरचे माजी प्राचार्य डॉ.एम.एस.दडगे हे उपस्थित होते. गांधीजींनी आश्रमात शिक्षण, स्वावलंबन यावर भर दिला. साध्य आणि साधन पवित्र असेल तर कार्य सिध्दीस जाते यावर त्यांचा विश्वास होता. तसेच अहिंसा म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे देव आणि देव म्हणजे अहिंसा असे गांधीजी म्हणत असत डॉ.वाघमारे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० नंतर सार्वजनिक जीवन कार्याला आरंभ केला, आरंभी त्यांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा आग्रह धरला पण अस्पृश्यांना माणुसकीचे हक्क मिळत नाही असे त्यांना दिसून आल्याने त्यांनी १९३५ ला हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा केली, सावकरांसोबत काम केले पण पुढे काही अभिप्रेत सुधारणा झाल्या नाहीत, म्हणून त्यांनी ख्रिश्‍चन, इस्लाम, शीख आदी धर्मांचा अभ्यास करुन याचा भूमीतला माणूस केंद्र बिंदू असलेला बौध्द धम्म १९५६ ला स्विकारला. १९५५ ला त्यांनी २५०० वी बुध्द जयंती साजरी केली, पं. नेहरुही बौध्द धम्माविषयी बाबासाहेब अगोदर बोलत असत.हिंदू धर्मातील अस्पृश्यता, जात आणि वर्ण व्यवस्था ही कालबाह्य असून ती सोडण्यासाठी व उद्याच्या सामाजिक परिवर्तनासाठी जातीसंस्थेचे उच्चाटन झाले पाहिजे.बाबासाहेबांनी जातीसंस्थेचे उच्चाटन या ग्रंथातून स्पष्ट केले आहे ते सर्वांनी वाचले पाहिजे. गांधी आणि आंबेडकर यांच्यात विनाकारण शत्रूत्व असल्याचे सांगितले जाते, गांधीशिवाय आंबेडकर आणि आंबेडकरांशिवाय गांधी पूर्ण होत नाहीत. असे मत डॉ.वाघमारे शेवटी व्यक्त केले.
बाबासाहेब आणि बापू एका गाडीची दोन चाके आहेत. आपण आपल्या चुका मान्य करत नाही, गांधींचा सत्य, अहिसेंवर अधिक भर होता. गांधीची मूळ तत्वे आपण अंगिकारली पाहिजेत. गांधी-आंबेडकर वाचले पाहिजे, वाढत्या तंत्रज्ञानाचा विनियोग चांगल्या कामासाठी, ज्ञानासाठी व्हावा असे मत प्राचार्य दडगे यांनी व्यक्त केले. या सत्राचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी केले, तर सूत्रसंचालन पी.सी.पाटील यांनी करुन ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे यांनी आभार मानले. या परिसंवादाच्या वैचारिक मेजवाणीला असंख्य वाचक, साहित्यप्रेमी उपस्थित होते.


Comments

Top