मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पुनर्जीवित करण्यात येणाऱ्या योजनांपैकी औसा तालुक्यातील मातोळा आणि खरोसा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
मातोळा योजनेच्या माध्यमातून 10 गावांना पाणी पुरवठा करण्यात येणार असून या सर्व गावांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. या योजनेत मातोळा, बेलकुंड, टाका, तावशिताड, चिंचोली, वंगजी, बोरफळ, वानवडा, नागरसोगाआणि फत्तेपुर या गावांचा समावेश आहे. मातोळा-१० गावे या योजनेसाठी ०६ कोटी १९ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. मातोळा योजनेला निम्न तेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होणार आहे.
औसा तालुक्यातील दुसरी योजना, खरोसा-०६ गावे या योजनेसाठी ०४ कोटी ३५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून खरोसा, किनीनवरे, तांबरवाडी, जवळी, चलबुर्गा, जाऊ, आनंदवाडी, आणि मोगरगा या गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. या योजनेला मसलगा मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे. या दोन्ही योजनां प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सदर योजनांचे काम तात्काळ सुरू करण्यात यावेत, असे निर्देश श्री लोणीकर यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.
विजेची बचत
मातोळा आणि खरोसा पाणी पुरवठा योजनांना सोलर वर चालणार असून त्यामुळे विजेची आणि संबंधित ग्रामपंचायतच्या पैशाची बचत होणार आहे. तसेच या योजनांना बल्क मीटर बसविण्यात येणार आहेत.
Comments